रेल्वे प्रवासामुळे शरीरासह मानसिक ताणही वाढतोय

रेल्वे प्रवासामुळे शरीरासह मानसिक ताणही वाढतोय

रेल्वे प्रवासामुळे शरीरासह मानसिक ताणही वाढतोय

गेल्या वीस वर्षात शहरांचा विस्तार झाला असला तरी रोजगार किंवा उद्योगासाठी अनेकजण मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरात मोठ्या संख्येने लोक येतात. त्यात मुंबईत येण्यासाठी असणारे ट्रॅफिक बघता रेल्वेच्या प्रवासावाचून पर्याय नसतो. पण, हाच रेल्वे प्रवास चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आपल्या शरीराची नाहक हानी होते. त्यासोबतच तासंतास उभे राहून प्रवास केल्याने त्याचा परिणाम शरीरासोबत मनावरही होत असल्याचे समोर आले आहे.

जास्त वेळ उभे राहिल्यामुळे हे होतात त्रास

रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेक वेळा प्रवासी सलग दीड ते दोन तास उभ्याने प्रवास करतात. उभे असताना किंवा चालताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतो. शरीराचा भार पेलता यावा यासाठी तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यात प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. एखाद्या स्प्रिंगप्रमाणे शरीराचा भार सांभाळण्याचे काम या स्नायूकडून केले जाते. जास्त वेळ उभे राहिल्यामुळे प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायूमध्ये घट्ट होते आणि टाचदुखी, गुडघेदुखी सुरू होते.

तसेच तळव्यांवर अधिक भार आल्यास म्हणजेच शरीराचे वजन वाढल्यास टाचांचे दुखणे सुरू होते. सतत उभे राहणे अथवा सतत बसून राहणे या दोन्ही गोष्टी शरीराला अपायकारक आहेत. शरीरामध्ये जीवनसत्त्व ‘ई’चा अभाव झाल्यामुळे सुद्धा टाचांचे दुखणे वाढते.  – डॉ विजय पाटील, अपेक्स हॉस्पिटल समूहाचे अस्थिव्यंगतज्ञ

बस एसटी कंडक्टर – ड्राइवर तसेच वाहतूक पोलीस, कुरियरची कामे करणारे तसेच फेरीवाले आणि उभ्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये पाठदुखी आणि टाचदुखीचे प्रमाण आढळते. वयाच्या ३० वयापर्यंत आपले शरीर उभे राहण्याचा भार पेलत असते. पण, एकदा तुम्ही वयाची तिशी अथवा चाळीशी पार केली की तुम्हाला गुडघेदुखी – कंबरदुखी सुरु होते. कारण, वयाच्या तिशीमध्येच पुढील तीस वर्षांचा भार आपल्या पायावर घेतलेला असतो, अशी माहिती डॉ.विजय पाटील यांनी दिली. तसेच २० ते ३० वयोगटात मानवी शरीराला शरीराचा पूर्ण भार झेलण्याची ताकद असते. पण, वयाच्या चाळीशीनंतर पायांच्या पेशी कमकुवत होतात. त्यामुळे, ३५ ते ६० या वयोगटातील व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टर्स देतात.


वाचा – रेल्वे प्रवासातील ‘ती’ ३० सेकंद महत्त्वाची

वाचा – रेल्वे प्रवासी घेऊ शकणार मोकळा श्वास…


 

First Published on: March 18, 2019 8:01 PM
Exit mobile version