३० प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन मशीन्स धुळखात

३० प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन मशीन्स धुळखात

Shatabdi Hospital

गोवंडी येथील शताब्दी अर्थात पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेल्या सुमारे ३० फ्रॅक्शनेशन मशीन्स धुळखात पडल्या आहेत. या सेंटरसाठी १५१ प्लाझ्मा फ्रॅक्शन मशीन्स मागवण्यात आल्या असल्या तरी यातील केवळ ३० मशीन्स आल्या आहेत. परंतु राष्ट्रीय रक्तद्राव विघटन केंद्र (प्लाझ्मा सेंटर) अद्यापही सुरू न झाल्याने या मशीन्स ताब्यात येऊन निरुपयोगी ठरल्या आहे.

गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात राष्ट्रीय रक्तद्राव विघटन केंद्राच्या पुनर्जिवीता प्रकल्प अर्थात प्लाझ्मा सेंटर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम सध्या ६० टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी एकूण १५१ फ्रॅक्शनेशन यंत्रांची मागणी केलेली आहे. त्यापैकी ३० मशीन्सचा पुरवठा झालेला असून उर्वरित १२१ मशीन्स येणे बाकी आहे. पुरवठा करण्यात येणार्‍या मशिन्सची एकूण किंमत ८.३४ कोटी रुपये एवढी आहे. या सेंटरचे काम पूर्ण झाल्यानंतर शताब्दी रुग्णालयासाठी मागवण्यात आलेल्या मशीन्स सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

शताब्दी रुग्णालयातील प्लाझ्मा फ्रॅक्शन मशीन सुरू करण्याची मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे. अत्यवस्थ रुग्णांना रक्ताची अथवा रक्तातील विविध घटकांची निकड असते. त्यापैकी अल्ब्यूमीन हा रक्तातील अत्यंत महत्वाचा घटक असून मूत्रपिंड व यकृत निकामी झालेले रुग्ण, कर्करोग ग्रस्त, भाजलेले रुग्ण तसेच अतिदक्षता विभागातील रुग्ण इत्यादींना या घटकांची जास्त आवश्यकता असते.

महापालिकेकडे दोन प्लाझ्मा मशीन्स असूनही प्लाझ्मा पृथ:करण करण्यासाठी बाहेरील खासगी यंत्रणेकडे पाठवले जाते. गोवंडी रुग्णालयातील प्लाझ्मा फ्रॅक्शन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तर शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनीही शताब्दी रुग्णालयात प्लाझ्मासाठीच्या मशीन खरेदी केल्यानंतरही त्या अजूनही तशाच धुळखात पडून असल्याचा आरोप केला आहे. एकाबाजूला स्थायी समितीत मुंबईकरांना चांगल्याप्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अशा मशिन्सच्या खरेदीचे प्रस्ताव मंजूर केले जातात, परंतु दुसरीकडे त्यांचा पुरवठा होऊनही वापर होत नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.

First Published on: April 18, 2019 5:17 AM
Exit mobile version