मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक मौन

मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक मौन

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray,Amit shah

महाराष्ट्रात युती झाली तर आम्हीच मोठा भाऊ असू असे शिवसेनेने वारंवार म्हटले होते. मात्र भाजपाने धाकटा भाऊ म्हणूनच शिवसेनेला युतीमध्ये स्वीकारले आहे. भाजपापेक्षा आम्हाला जास्त जागा मिळायला हव्यात ही शिवसेनेची अट होती, मुख्यमंत्री आमचा असेल ही अटही त्यांनी ठेवली होती. मात्र या कोणत्याही अटी मान्य न करता युती झाली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत दोन्ही नेत्यांनी सूचक मौन बाळगल्याने शिवसेनेने आता समसमान संधी म्हणून अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपकडे केली आहे. भाजपने मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे सहा महिन्यांनंतर युतीतील खरा कलगीतुरा पहायला मिळणार आहे.

सोमवारी शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरी लोकसभा निवडणुकीसाठी ठरलेला जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला तरी विधानसभेबाबत संभ्रम कायम ठेवत मित्रपक्षांना सोडलेल्या जागांनंतर ५०-५० फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. मित्रपक्षाने २० जागांची मागणी केली असली तरी शिवसेना केवळ ८ जागा सोडाव्यात या मागणीवर ठाम आहे. राज्यात सत्ता आल्यावर मुख्यमंत्री कोणाचा याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पध्दतशीर मौन बाळगले असले तरी मुख्यमंत्रीपदावर सेनेने दावा केला आहे, पण भाजपने चकवा देत शिवसेनेला उपमुख्य-मंत्रीपदापर्यंत सीमित ठेवण्याचा मनसुबा ठेवला आहे. मागील दहा वर्षांत राज्यात शिवसेनेची ताकद कमी असताना भाजपचे मात्र लोकप्रतिनिधींची संख्या वाढत चालली आहे.

त्यामुळेच ‘मुख्यमंत्री’ पदाबाबत शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेली खदखदही लोकसभा निवडणुकीसाठीच्या युतीची घोषणा करताना स्पष्टपणे दिसून आली. युतीशिवाय केंद्रात आणि राज्यात निवडणुका लढवल्यास दोन्ही पक्षांना फटका बसेल, असे जनतादल संयुक्तचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर याने काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेताना सांगितले होते. त्यामुळे भाजपशी जुळते घेण्याची तयारी दर्शवत उध्दव ठाकरे यांनी भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याआधी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहील, असे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत सातत्याने बोलून दाखवत होते. युतीच्या चर्चेवेळी ही मागणी शिवसेनने लावून धरली, मात्र भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’ला दिली. सोमवारी भाजपचे राष्ट्रीय प्रमुख अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’ वर येऊन युतीचा फॉर्म्युला जाहीर केला. यावेळी बोलताना विधानसभेतील जागांचा केवळ ५०-५० हा फॉर्म्युला ठरला नाही, तर पद आणि जबाबदार्‍याही सम-समान पद्धतीने दिल्या जातील, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक मौन बाळगले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर नुसते स्मितहास्य करत मौन धरले. त्यानंतर मात्र लगेचच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ जागांवर तर भाजप २५ जागांवर लढणार आहे. त्यानंतर विधानसभेला दोन्ही पक्ष समसमान जागांवर लढतील. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे विचारात न घेता राज्यातील सत्ता आणि पदे समान कालावधीसाठी वाटून घेतली जातील, असे सांगत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी विभागून घेण्याबाबत सूचित केेले.

सद्याचे संख्याबळ पाहता भाजपचे 23 खासदार तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत. विधानसेभेत भाजपचे 122 तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. अनेक मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी केल्याने सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, सातारा, इचलकरंजी या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपदाबाबत थोडीशी मवाळ भूमिका घेत जम्मू काश्मिरप्रमाणे अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी आतापासूनच बोलणी सुरू केल्याची माहिती सेनेच्या ज्येष्ठ नेत्याने दिली. असे असले तरी भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीचा सत्तेचा फॉर्म्युला शिवसेनेला देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि हवी असल्यास जास्त कॅबिनेट मंत्रीपद देवू, अशी माहिती मुंबईतील भाजपच्या एका नेत्याने दिली. शिवसेना-भाजपची गेली तीस वर्षे युती असली तरी 2014च्या विधानसभेत मात्र हे दोन पक्ष एकमेकांविरुद्ध लढले होते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर लढणार आहे. त्यानंतर विधानसभेला दोन्ही पक्ष समसमान जागांवर लढतील. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे विचारात न घेता राज्यातील सत्ता आणि पदे समान कालावधीसाठी वाटून घेतली जातील.-आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना

भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती होणार हे निश्चितच होते. मागच्या साडेचार वर्षांमध्ये एकमेकांवर वाट्टेल तेवढे आरोप प्रत्यारोप करून झाले आता युती केली आहे. जनता या दोन्ही पक्षांना ओळखून आहे, यांना पुन्हा निवडून दिले जाणार नाही याची खात्री मला वाटते.-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

२०१४ साली अनुकूल वातावरण होते म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, मात्र २०१९मध्ये युतीचा मुख्यमंत्री असेल.
-एकनाथ खडसे, ज्येष्ठ नेते, भाजप

First Published on: February 20, 2019 6:25 AM
Exit mobile version