भुताने झपाटल्याचा संशयावरून माय-लेकाची हत्या, कल्याणमधील धक्कादायक प्रकार!

भुताने झपाटल्याचा संशयावरून माय-लेकाची हत्या, कल्याणमधील धक्कादायक प्रकार!

प्रातिनिधीक फोटो

मांत्रिकाच्या सांगण्यावरून १७ वर्षांच्या मुलाने वडील आणि आजीच्या अंगातील भूत काढण्याच्या नादात दोघांना काठीने बेदम मारहाण केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्रातील कल्याण येथे शनिवारी रात्री उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मांत्रिकासह चार जणांविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला असून मुलगा, दोन पुतणे आणि मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. पंढरीनाथ तरे (५०) आणि चंदूबाई तरे (७६) अशी अंधश्रद्धेला बळी पडलेल्या मायलेकरांची नावे आहेत. कल्याणच्या आंबवली जवळ असणाऱ्या अटाळी गाव येथे राहणारे पंढरीनाथ तरे शेती करतात. पंढरीनाथ आई चंदूबाई आणि १७ वर्षांच्या मुलासह अटाळी गावात राहात होते. त्याच गावात त्यांचे मोठे बंधू कैलास तरे आपल्या कुटुंबियांसह राहतात.

वडील आणि आजी माझ्यासोबत विचित्र वागतात असे पंढरीनाथ यांच्या अल्पवयीन मुलाने आपला चुलत भाऊ विनायक आणि चुलत बहीण कविताला सांगितले. कविता आणि विनायक हे दोघे त्याला घेऊन गावातच राहणाऱ्या सुरेंद्र पाटील (३५) या मांत्रिकाकडे घेऊन गेले होते. तुझ्या वडिलांना आणि आजीला भुताने झपाटले आहे, त्यांचे भूत उतरावे लागेल असे मांत्रिकाने त्यांना सांगितले. तिघेही यासाठी तयार झाले आणि शनिवारी सायंकाळी हे तिघे पंढरीनाथ आणि आजी चन्दूबाई यांना घेऊन मांत्रिकाकडे गेले.

मांत्रिक सुरेंद्र पाटीलने पूजापाठ करून पंढरीनाथ आणि आजीच्या पाठीवर कुंकू हळद लावली आणि पंढरीनाथचा मुलगा आणि त्याच्या चुलत भावंडांच्या हातात काठ्या देऊन भूत उतरत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीत काठीने प्रहार करण्यास सांगितले. या तिघांनी मिळून तब्बल चार तास पंढरीनाथ आणि चंदूबाई यांना काठीने मारहाण केली. दोघेही काकुळतीला येऊन मारू नका ओरडत असताना देखील या तिघांनी मारहाण सुरु ठेवली. अखेर मारहाणीमुळे मायलेक दोघेही निपचित पडले आणि त्यात त्यांचा जीव गेला.

वडील आणि आजी उठत नाहीत हे बघून मांत्रिकासह चौघेही घाबरले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना हे वृत्त गावभर पसरले आणि गावकऱ्यांनी चौघांना पकडून खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंढरीनाथ आणि चंदूबाई या दोघा माय लेकाला उपचारांसाठी रुख्मिणीबाई रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी हत्या, अंधश्रद्धा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलासह, मांत्रिक सुरेंद्र पाटील, चुलत भाऊ बहीण विनायक आणि कविता यांना अटक केली असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बांगर यांनी दिली. तसेच अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठ्वण्यात आले आहे.

First Published on: July 26, 2020 7:26 PM
Exit mobile version