नगरसेवक कप्तान मलिकांवर पालिका मुख्यालयाच्या आवारात दंडात्मक कारवाई

नगरसेवक कप्तान मलिकांवर पालिका मुख्यालयाच्या आवारात दंडात्मक कारवाई

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरच पालिका मुख्यालयाच्या आवारात दंडात्मक कारवाई

मुंबईत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मंगळवारी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगरसेवकावरच कारवाई केल्यामुळे पालिका मुख्यालयातील अधिकारी, सुरक्षारक्षक, कर्मचारी आता सावध झाले आहेत. राष्ट्रवादी नगरसेवक कप्तान मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून मंत्री नवाब मलिक यांचे ते भाऊ आहेत.

मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू केले. ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळांचे दरवाजेही खुले करण्यात येणार आहेत. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यामुळेच आजही कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी तोंडवर मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

मात्र मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक हे मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकासमोरील ( सीएसएमटी) मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आवारात गेट क्रमांक ६ समोर एका पालिका सुरक्षारक्षकाशी बोलत असताना त्यांचा तोंडावरील मास्क नाकावर नव्हता. तो मास्क तोंडाच्या खाली म्हणजे मानेवर आलेला होता. त्याच वेळी पालिका इमारतीजवळून जाणाऱ्या पोलिसांच्या पथकाला नगरसेवक कप्तान मलिक यांच्या नाकावर मास्क नसल्याचे आढळून आले.

या पोलीस पथकातील पोलीस अधिकाऱ्याने नगरसेवक कप्तान मलिक यांना हटकले व त्यांना जवळ बोलावून जाब विचारला. यावेळी, नगरसेवक कप्तान मलिक यांनी, मास्क तोंडाखाली आल्याबाबत स्पष्टीकरण देण्याचा व आपली बाजू सावरण्याचा, मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ; मात्र पोलिसांनी नियमांवर बोट ठेवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत २०० रुपयांची पावती फाडली व त्यांच्या हातात टेकवली. नगरसेवक मलिक यांनी नाईलाजाने त्यांना ५०० ची नोट काढून देत दंडाची रक्कम मुकाटपणे भरली. पोलिसांनी नगरसेवकांवर केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे पालिका आवारातील पालिका सुरक्षारक्षक, कर्मचारी यांच्या भुवया उंचावल्या व तेही सतर्क झाले.

कायद्याचे पालन केलेच पाहिजे – कप्तान मलिक

पालिका मुख्यालयात दंडात्मक कारवाई केल्यावर नगरसेवक कप्तान मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या तोंडावरील मास्क खाली आलेला होता. त्यामुळे मला पोलिसांनी हटकले. त्यांनी मला दंडाची रक्कम भरायला सांगितली. शेवटी कायद्याचे पालन तर करायलाच पाहिजे ना असं नगरसेवक कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आव्हाड बदनामी प्रकरणी सोमय्यांना अखेर जामीन, सेशन कोर्टाने ठेवल्या कठोर अटी


 

First Published on: October 5, 2021 7:37 PM
Exit mobile version