शिवजयंती कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात

शिवजयंती कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात

शिवजयंतीसाठी रस्ता अडवून स्टेज उभारल्याने कारवाई

उल्हासनगर येथे शिवजयंती निमित्ताने रस्त्यात स्टेज उभारुन कार्यक्रम साजरा केला जात असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. या प्रकरणी हिराली फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पोलिसात तक्रार केली. तर दुसरीकडे आचारसंहिता लागल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारची परवानगी मिळत नाही, संबंधित प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. उल्हासनगर-१ येथील बिर्ला गेट जवळ असलेल्या चौकात नीळकंठ मंदिर आहे. या मंदिराच्या एका बाजूला रस्ता पूर्णपणे बंद करून स्थानिक शिवसेना नेत्यांनी स्टेज उभारला होता. हा रस्ता कल्याण-नगर राज्य महामार्गाचा जोडरस्ता असून अत्यंत वर्दळीचा असतो. आज २३ मार्च रोजी शिवजयंती निमित्त या रस्त्यात स्टेज उभारून कार्यक्रम राबविण्यात आला होता.

यापूर्वी देखील तक्रार

हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला असून, याबाबत ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली आहे. या पूर्वी उल्हासनगर-४ येथे भर रस्त्यात स्टेज उभारून ध्वनी प्रदूषण केल्याच्या आरोपावरून नगरसेवक शेरी लुंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा सरिता खानचंदानी यांनी त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता .

पोलिसांनी केली कारवाई

या तक्रारीची दखल घेत शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पथक, आचारसंहिता पथक, उल्हासनगर मनपाचे सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीला अडथळा आणणारा स्टेज त्वरित हटवून वाहतूकीचा मार्ग मोकळा केला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी सोशल मीडियावर आरोप केला की शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्ही मनपा प्रशासन, तहसीलदार कार्यालय, प्रांत अधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली परंतु आचारसंहिताचे कारण देत ते जबाबदारी टाळत आहेत.

 

 

First Published on: March 23, 2019 9:16 PM
Exit mobile version