प्रकाश गजभियेंकडून तिरंग्याचा अपमान, सुरजितसिंह ठाकूरांनी सुनावलं

प्रकाश गजभियेंकडून तिरंग्याचा अपमान, सुरजितसिंह ठाकूरांनी सुनावलं

प्रकाश गजभियेंनी तिरंग्याचा अपमान केल्यानंतर विधानभवनात आरडाओरडा झाला!

नेहमी अधिवेशनात वेगवेगळ्या विषयांवर वेषांतर करून येणारे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे सोमवारी पुन्हा एकदा एका नव्या वेशात आल्याचे पहायला मिळाले. यावेळी काळे कपडे, डोक्यावर टोपी आणि हातात तिरंगा घेऊन आलेल्या प्रकाश गजभिये यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर भारताचा तिरंगा हातात काठीला गुंडाळून ठेवल्याने भाजप आमदार सुरजितसिंह ठाकूर चांगलेच संतापले. संतापलेल्या सुरजित सिंह ठाकूर यांनी ‘हा पक्षीय ध्वज नाही गुंडाळून ठेवायला, हा तिरंगा आहे. अरे काय चालवले आहे काय? तिरंग्याचा अपमान करताय? तुम्ही झेंडा गुंडाळून कसा ठेवता?’ असे म्हणत प्रकाश गजभिये यांना खडेबोल सुनावले. दरम्यान, सुरजित सिंह ठाकूर यांनी सुनावताच प्रकाश गजभिये यांनी झेंडा नीट पकडत ‘मला तुमच्याशी नाही तर तुमच्या मोदींशी बोलायचे आहे’, असे सांगत तिथून काढता पाय घेतला.

सोमवारी दुपारी सत्तेत असूनही, सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा निषेध करण्यासाठी प्रकाश गजभिये काळ्या रंगाचे कपडे, डोक्यावर टोपी आणि हातात तिरंगा घेऊन आले होते. त्यामुळे आधीच विरोधकांमध्ये चर्चा सुरू असताना गजभिये यांनी हातात झेंडा गुडांळून ठेवल्याने विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. लागलीच त्यांच्या हातात गुंडाळलेला झेंडा बघताच सुरजितसिंह ठाकूर संतापले आणि त्यांनी गजभिये यांना जाब विचारला.

याआधीही महाराजांच्या वेशात मुजरा केल्याने अडचणीत

अधिवेशनादरम्यान वेशांतर करुन येणे हे प्रकाश गजभिये यांच्यासाठी काही नवीन नाहीत. मात्र यामुळे गजभिये अडचणीत देखील सापडल्याचे पहायला मिळाले आहे. या अगोदर विरोधी बाकांवर असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून आलेल्या गजभिये यांनी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना महाराजांच्या वेशात असताना मुजरा केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यात आज तिरंगा हातात गुंडाळून घेतल्याने गजभिये पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.

सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा निषेध करण्यासाठी मी वेष करून आलो आहे. माझा देश अस्वस्थ होत आहे. त्यामुळे मी विरोध करण्यासाठी आलो आहे. हा कायदा राज्यात लागू होऊ नये अशी माझी मागणी आहे.

प्रकाश गजभिये, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

First Published on: February 24, 2020 6:27 PM
Exit mobile version