नेत्रहीन प्रांजल पाटील दिल्ली महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी  

नेत्रहीन प्रांजल पाटील दिल्ली महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी  

प्रांजल पाटील

उल्हासनगरची तरुणी प्रांजल पाटील हिची नुकतीच देशाची राजधानी दिल्ली महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नेत्रहीन असून देखील प्रांजलने बिकट परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठले आहे. प्रांजलच्या नियुक्तीनंतर तिचे शहरातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली. देशात ७७३ तर महाराष्ट्र राज्यात तिचा ७ वा क्रमांक आला. पास होऊन देखील केडर रँकिंगमध्ये अव्वल येण्यासाठी तिने पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने चांगले यश मिळाले व राज्यात ५ व्या तर देशात १२५ व्या क्रमांकावर तिने झेप घेतली. भारतीय रेल्वे प्रशासनात अकाउंट विभागात अधिकारी पदावर तिची नियुक्ती करण्यात आली. मात्र, रेल्वे प्रशासनाने पदभार देण्यात वेळकाढूपणा केल्याचे सांगण्यात येते.

त्यानंतर २०१८ मध्ये केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून प्रांजलची नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी तिने दोन वर्षे उत्कृष्टपणे कामगिरी बजावली. पुढे दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली. २५ जानेवारी २०२१ ला राष्ट्रीय मतदार दिनी सर्वोत्तम मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तिला दिल्ली राज्य सरकार तर्फे गौरविण्यात आले होते. नुकतीच प्रांजल पाटीलची नियुक्ती दिल्ली महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी करण्यात आली आहे.

उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते एल. बी. पाटील यांची कन्या प्रांजल पाटील ही चौथीपर्यंत सामान्य मुलांसारखी होती. मात्र, त्यानंतर तिच्या डोळ्याची दृष्टी क्षीण होत गेली आणि एका वर्षात तिला काहीही दिसेनासे झाले. प्रांजलच्या पालकांसमोर मुलीच्या भविष्याबाबत चिंता भेडसावू लागल्या. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. प्रांजलला ते प्रोत्साहन देऊ लागले. १० वीच्या परीक्षेत ९१ टक्के तर १२ वीत तिने यश संपादन केले. पुढे पदवी परीक्षा मुंबई विद्यापीठातून व पदव्युत्तर परीक्षा दिल्लीच्या जवाहरलाल युनिव्हर्सिटीमधून ती मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली.

First Published on: March 25, 2021 11:10 PM
Exit mobile version