लसीकरणासाठी वॉक-इनला आरोग्य कर्मचार्‍यांचे प्राधान्य

लसीकरणासाठी वॉक-इनला आरोग्य कर्मचार्‍यांचे प्राधान्य

कोरोना लसीबाबत आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम असल्याच्या बातम्या येत असल्या तरी प्रत्यक्षात लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी केंद्रांवर रांगा लावत आहेत. अ‍ॅपमध्ये सुरुवातीला आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य कर्मचार्‍यांसाठी वॉक-इनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा अधिकाधिक कर्मचारी फायदा घेत असून, कोविन अ‍ॅपद्वारे मेसेज येण्यापूर्वीच अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाची लस घेण्यासाठी केंद्रांवर हजेरी लावत आहेत. परिणामी कोविन अ‍ॅपच्या तुलनेत वॉक-इनच्या माध्यमातून लस घेण्याकडे आरोग्य कर्मचार्‍यांचा अधिक कल दिसून येत आहे.

कोविन अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु अ‍ॅपमध्ये येणार्‍या तांत्रिक अडचणीमुळे राज्य सरकारने आरोग्य कर्मचार्‍यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. याचा फायदा आरोग्य कर्मचार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लस घेणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अधिक असली तरी अ‍ॅपच्या तुलनेते वॉक-इनच्या माध्यमातून लस घेतलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. मुंबईमध्ये २५ जानेवारीला अ‍ॅपच्या माध्यमातून पाच हजार जणांना लस देण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅपच्या माध्यमातून १८०० जणांनी लस घेतली होती. तर अ‍ॅपवर नोंदणी असलेल्या पण वॉक-इनच्या माध्यमातून लस घेतलेल्यांची संख्या तब्बल ३२०० इतकी होती, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. त्याचप्रमाणे राजावाडी रुग्णालयामध्ये २५ जानेवारीला लस घेतलेल्या ६८० पैकी ३९६ जणांनी वॉक-इनच्या माध्यमातून तर २८२ जणांनी अ‍ॅपच्या माध्यमातून लस घेतली. तसेच २३ जानेवारीलाही ६४० जणांना लस देण्यात आली. त्यातील ४०० जणांनी वॉक-इनच्या तर २४० जणांनी अ‍ॅपच्या माध्यमातून लस घेतल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

अ‍ॅपने दिलेल्या तारखेला अनेक डॉक्टर, परिचारिका किंवा आरोग्य कर्मचार्‍यांना लस घेण्यासाठी जाणे शक्य होत नाही. अशा कर्मचार्‍यांना अ‍ॅपच्या माध्यमातून तीन पर्याय दिले असले तरी आपल्याला लवकरात लवकर लस मिळावी यासाठी आरोग्य कर्मचारी पुढील मेसेज येण्यापूर्वी वॉक-इनला प्राधान्य देत आहेत. त्याचप्रमाणे ज्या कर्मचार्‍यांना अ‍ॅपच्या माध्यमातून अद्यापपर्यंत मेसेज आला नाही, असे आरोग्य कर्मचारीही मेसेजची वाट न पाहता वॉक-इनला प्राधान्य देत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांची अ‍ॅपमध्ये नोंद असल्याने त्यांची ओळख पटवून आरोग्य केंद्रांवर त्यांना वॉक-इनच्या माध्यमातून लस दिली जात आहे.

First Published on: January 27, 2021 8:13 PM
Exit mobile version