नालासोपार्‍यातून भाजप, आगरी सेनेचीही मोर्चेबांधणी

नालासोपार्‍यातून भाजप, आगरी सेनेचीही मोर्चेबांधणी

विधानसभा

महायुतीत अद्याप जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी शिवसेनेने नालासोपार्‍यातून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. तर भाजप आणि आगरी सेनेमधून इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचवेळी बहुजन विकास आघाडीने नालासोपार्‍यात बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मोट बांधायला घेतली आहे.

यावेळी नालासोपारा मतदारसंघाकडे सार्‍या राज्याचे लक्ष असणार आहे. त्याला कारण, शिवसेनेतून प्रदीप शर्मा यांना दिली जाणारी उमेदवारी. महायुतीत अद्याप जागा वाटप निश्चित झालेले नाही. पण, त्याआधीच लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मिळालेली आघाडी लक्षात घेऊन शिवसेनेने शर्मा यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईतील प्रमुख पदाधिकार्‍यांशी एकेकाशी थेट संवाद साधला. त्यात जवळपास सर्वच पदाधिकार्‍यांनी शर्मा यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली.

शर्मा अद्याप स्वतः मैदानात उतरले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळया माध्यमातून प्रचार सुुरू केला आहे. शर्मा यांच्या पीएस फाउंडेशनने गेल्या आठवड्यात नालासोपारा मतदारसंघात छत्री वाटप केले. काही सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमासाठी आर्थिक हातभारही लावला. शर्मा नालासोपारा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील वजनदारांशी हस्ते, परहस्ते संपर्क साधत आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडीतील अनेक बड्यांचाही समावेश आहे.

दुसरीकडे, भाजपातूनही या मतदारसंघातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. राजन नाईक पुन्हा इच्छुक आहेत. तर डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनीही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. उत्तरभारतीयांची मते खेचण्यासाठी बाहेरचा उमेदवार लादण्यापेक्षा जिल्ह्यातीलच उत्तरभारतीय द्या, अशी त्यांची मागणी आहे. आपण पालघर जिल्ह्यातीलच आहोत. नालासोपारा मतदारसंघाशी आपला गेल्या अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. उत्तरभारतीयांशी माझा दररोजचा संंबंध येतो. म्हणून आपणाला संधी मिळायला हवी, असे राजपूत यांचे मत आहे.

तर, आगरी सेनेकडूनही नालासोपारा मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. मे 2018 ची लोकसभा पोटनिवडणुक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आगरी सेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. बविआला पराभूत करण्याची ताकद आगरी सेनेत आहे. त्यासाठी आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. महायुतीने मित्र पक्षांना जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात आगरी सेनेचा महायुतीलाच फायदा होणार असल्याचे सांगत नालासोपार्‍यातून आग्रह धरण्यात आला आहे.

First Published on: July 30, 2019 4:33 AM
Exit mobile version