कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्यावर ऐतिहासीक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कल्याणकरांसह ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये लाखो भक्तांची गर्दी होते.

शिवसेनाप्रमुखांनी सुरु केली परंपरा

दुर्गाडी किल्ल्यावर शिवरायांनी स्वत: देवीचं मंदिर उभारल्याचं बोललं जातं. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासीक महत्व आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाची सुरूवात केली होती. ही परंपरा आजही कायम आहे. नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गाडी किल्ला रोषणाईने उजळून निघतो. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्हयातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मागील वर्षी नवरात्री उत्सवात सुमारे ७ लाख भक्तांनी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं होतं. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने देवस्थान समितीने विशेष काळजी घेतली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय व असुविधा होऊ नये, कोणताही त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे. मंडप, गालिच्यापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मंदिरासह किल्ल्याच्या इतर भागात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चलचित्र सुद्धा किल्ल्यावरच साकारण्यात आले आहे, अशी माहिती कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख व देवस्थान समितीचे प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली.

हेही वाचा – पुण्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न – चंद्रकांत पाटील

काय आहे इतिहास?

सातवाहन काळापासून कल्याण हे एक महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जात होते. १६५७ पर्यंत कल्याणचा ताबा आदिलशहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचे महत्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराज्यात सामील करून घेतले. या भागाचे भौगोलिक महत्व जाणून छत्रपतींनी कल्याणमधील खाडीकिनारी किल्ला बांधण्याचे ठरविले. किल्ल्याचे बांधकाम करताना महाराजांना तिथे अमाप संपत्ती सापडली. देवी दुर्गेच्या आशीर्वादानेच ही संपत्ती सापडली आहे, असे समजून महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले आणि त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले.

First Published on: September 27, 2019 6:51 PM
Exit mobile version