लॉ प्रवेशाचा नवा तिढा; अनेकांचे प्रवेश लटकले

लॉ प्रवेशाचा नवा तिढा; अनेकांचे प्रवेश लटकले

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकलेला लॉ अभ्यासक्रम आता प्रवेश प्रक्रियेमुळे वादात अडकला आहे. प्रवेश प्रक्रिया राबविणार्‍या सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रवेश कॉलेजांनी नाकारल्याने नव तिढा सोमवारी उघडकीस आला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची सूर उमटले आहेत. दरम्यान, याप्रकरणी युवा सेनेने आक्रमक पवित्रा धारण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ऑनलाइन पोर्टलमध्ये गुण नमूद करण्यास अडचणी आल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लॉ प्रवेशाकडे वाढलेला ओढा लक्षात घेता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी हे प्रवेश ऑनलाइन देण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला. त्यावेळी सीईटी सेलच्या माध्यामतून यंदाही लॉ प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. नुकतीच 4 सप्टेंबर रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना अलॉट करण्यात आलेल्या कॉलेजांत संपर्क साधला तेथे जेव्हा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली तेव्हा विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जात आणि प्रत्यक्ष गुणपत्रिकेवरील गुणांत तफावत आढळून आली. यामुळे कॉलेजांनी प्रवेश नाकारला. यानंतर विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे धाव घेतली असता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना आधीच्या सहा सत्रांचे गुण भरताना गडबड केल्याचे निदर्शनास आले यामुळे विद्यार्थ्यांची चूक असल्याचे निदर्शनास आले. यानंतर विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेचा आधार देत त्यानुसार आम्ही गुण भरल्याचे मान्य केले.

माहिती पुस्तिकेत गुण कसे भरावे याबबात संद्गिधता असल्याने हा घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ही अडचण केवळ मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसून आले याचे कारण विद्यापीठातील निकालात गुण नसून ग्रेड्स देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे भरतातना गोंधळ झाल्याचे समोर आले. याबाबत विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर विद्यार्थ्यांना तिन्ही याद्या जाहीर होईपर्यंत वाट पाहण्याचे सूचित करण्यात आले. याला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे तात्पुरते प्रवेश देण्यात आले. मात्र हे प्रवेश भविष्यात कोणत्याही क्षणी काढून घेतले जाऊ शकतात असे विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले आहे.

दरम्यान, सीईटी सेलने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी अशी मागणी युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी केली आहे. या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे व उच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत मागणी केली जाईल असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. तर याबद्दल बोलताना सीईटी सेलचे आनंद रायते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी गुण भरताना काही चूका केल्या. यात गुण भरल्यानंतर त्याचे एकत्रिकरण करून अंतिम गुण काढले जातात ज्याच्या आधारे प्रवेश दिले जातात. हे गुण भरण्यात चुका झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही चुकली. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

First Published on: September 11, 2018 5:00 AM
Exit mobile version