लोकल सुरु करण्यासाठी मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव!

लोकल सुरु करण्यासाठी मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव!

मुंबई लोकल ट्रेन

गेल्या पाच महिन्यापासून कोरोनामुळे मुंबईची उपनगरी लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. राज्य सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा केली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरु होणार याबाबत स्पष्टता नाहीये. मात्र संपुर्ण टाळेबंदी उठल्यानंतर लोकल सेवा पुर्वपदावर येण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महानगर पालिका आणि ईतर महापालिकांसोबत रेल्वे प्रशासनाचे बैठकीचे सत्र सुरु आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कामाची वेळ बदल्यांवर विचार सुरु आहे. या संदर्भातील एक बैठक पार पडली असून लवकरच दुसरी बैठक होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.वी.एल सत्यकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तब्बल पाच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरू करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्या, कार्यालयातील लोकांसाठीही आतापर्यंत लोकल सेवा बंदच असल्याने बेस्ट आणि एसटी बसेसवर सर्वसामान्य प्रवाशांना अवलंबुन राहावे लागत आहे. त्यामुळे सर्वस्तरातून लोकल सेवा सुरु करण्याची मागणी आता जोर धरत आहे. यातच पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.वी.एल सत्यकुमार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदमध्ये मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यसाठी सुरु करण्यावर सकारात्मक उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले टाळेबंदीनंतर जेव्हा लोकलची वाहतुक सर्व सामान्य प्रवाशांसाठी सुरु होईल, तेव्हा गर्दीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकल प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता राज्य सरकार, मुंबई महानगर पालिका आणि रेल्वेची एक बैठक पार पडली आहे. ज्यात मुंबई आणि उपनगरातील शासकीय, खाजगी कंपन्या,  कार्यालयातील कामाच्या वेळा बदलण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल केल्यानंतर त्याप्रमाणे लोकलचे वेळापत्रकही बदलण्यात येणार आहे. याकरिता पालिका वॉर्ड ऑफिसची मदत घेण्यात येत आहे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंस्निग नियम पाळत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. सध्याच्या घडीला आत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची संख्या सुमारे तीन लाख आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या दिवसभरात ७०० फेऱ्या चालविण्यात येतात. या कर्मचार्यांना प्रवासाकरिता ई-पास देण्यात येत आहे. सध्या सुमारे दीड लाख कर्मचार्यांना ई-पास देण्यात आला आहे. ज्याप्रमाणे आता रेल्वेच्या प्रवेशद्वारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकलची वाहतूक पुर्णपणे सुरु झाल्यानंतरही रेल्वेच्या प्रवेशद्वारांवर त्याच पद्धतीने निर्बध घालण्यात येणार आहेत. अशी माहितीही सत्यकुमार यांनी दिली आहेत.


हे ही वाचा – ‘बॉलिवूड कलाकारांची नार्को टेस्ट केली तर’, कंगणाचे पुन्हा धक्कादायक वक्तव्य!


First Published on: August 26, 2020 8:15 PM
Exit mobile version