क्यूएस इंडिया रँकिंग : मुंबई आयआयटी पहिल्या तर मुंबई विद्यापीठ चौथ्या स्थानी

क्यूएस इंडिया रँकिंग : मुंबई आयआयटी पहिल्या तर मुंबई विद्यापीठ चौथ्या स्थानी

मुंबई विद्यापीठ

ऑनलाईन पेपर तपासणीचा घोळ, निकालांमध्ये उडालेला गोंधळ, महिनोन् महिने रखडलेले निकाल आणि त्यानंतर नुकताच झालेला पासिंग रॅकेटचा पर्दाफाश या घटनांमुळे फक्त मुंबईतच नाही तर देशभरात मुंबई विद्यापीठाची नाचक्की झाली होती. मात्र आता या नकारात्मक घटनांमधून स्वत:ला सावरत मुंबई विद्यापीठानं मोठी झेप घेतली आहे. देशभरातील विद्यापीठांच्या दर्जानुसार त्यांचं नामांकन करणाऱ्या क्यूएस इंडिया रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठानं स्थान मिळवलं आहे. राज्यात मुंबई विद्यापीठाचा पहिला क्रमांक लागला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनासोबतच मुंबईचीही मान अभिमानानं उंचावली आहे. मुंबई आयआयटीनं तर त्याहून मोठी कामगिरी करत क्यूएस इंडिया रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठानं चौथ्या स्थानी झेप घेतली असली, तरी इतर सर्व विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ १४व्या तर पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ १९व्या स्थानावर आहे.

शेवटी मुसंडी मारलीच!

क्यूएस च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे. गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्स मध्ये १५६ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी सलंग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारिणीवर कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि साश्वत प्रयत्नांची ही फळनिश्पती आहे. या निकालाचं समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. राज्य सरकारच्या मदतीने उद्योजकता वाढविण्यासाठी विद्यापीठात लवकरच इन्क्युबेशन सेंटरची स्थापना होणार आहे.

प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

मुंबई आयआयटी देशभरात पहिल्या स्थानी

दरम्यान, मुंबई आयआयटीनं देशभरातल्या सर्वच संस्थांना मागे टाकत क्यूएस इंडिया रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ आणि मुंबई आयआयटी यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे मुंबईकरांच्या शिरपेचात मानाचा दुहेरी तुरा खोवला गेला आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – सापाच्या विषावर जालीम उतारा, मुंबई विद्यापीठाचे संशोधन

First Published on: October 17, 2018 6:05 PM
Exit mobile version