राहुल गांधी ऑन ट्रबल शूटिंग मोड, मुंबई काँग्रसमधल्या वादावर तोडगा?

राहुल गांधी ऑन ट्रबल शूटिंग मोड, मुंबई काँग्रसमधल्या वादावर तोडगा?

बीकेसीमध्ये राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर जोरदार टीका

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र आता हा वाद मिटवण्यासाठी राहुल गांधी पुढाकार घेत असल्याचे शुक्रवारी मुंबईच्या बीकेसीमधल्या जाहीर सभेच्या मंचावर पहायला मिळाले. मुंबईतल्या जाहीर सभेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचे भाषण सुरू असताना थेट त्यांच्याबाबत नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांशीच राहुल गांधींनी चर्चा केल्याचे पाहायला मिळाले. या नाराजांना एका एकाला बोलावून राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

‘यांच्याशी’ केली राहुल गांधींनी चर्चा!

संजय निरुपम यांचं भाषण सुरू असताना मुंबईतील संभाव्य उमेदवारांना बोलवून राहुल गांधी यांनी चर्चा केली. सुरवातीला प्रिया दत्त यांना बाजूला बसवून राहुल गांधी यांनी चर्चा केली. त्यानंतर एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदूरकर आणि नंतर मिलिंद देवरा यांच्याशी राहुल गांधी यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे संजय निरुपम यांचे भाषण संपताच राहुल गांधींनी हे ‘मिशन मुलाखत’ थांबवल्याचे पहायला मिळाले.


हेही वाचा – …तर मोदींना देश सोडून पळ काढावा लागेल – राहुल गांधी

मुंबई काँग्रेसमध्ये निरूपमविरोध जोरावर!

मुंबई काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे. दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत आणि संजय निरूपम यांच्यात वाद होते. मात्र, गुरुदास कामत यांच्या निधनानंतर कामत गटात असणारे एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप, सुरेश शेट्टी यांनी निरूपम हटावची मोहीम सुरु केल्याचं बोललं जात होतं. त्यांनी मध्यंतरी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन निरुपमांना हटण्याची मागणी केल्याचं देखील समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मुंबई काँग्रेसमधला हा वाद कमी करण्यासाठी ऐन सभा सुरु असतानाच ट्रबल शूटिंग मोडवर गेल्याचं पाहायला मिळालं.

First Published on: March 1, 2019 8:20 PM
Exit mobile version