मुंबई जिंकण्यासाठी राहुल गांधींचा स्पिरीट मंत्रा

मुंबई जिंकण्यासाठी राहुल गांधींचा स्पिरीट मंत्रा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी

मुंबई शहर हे संपूर्ण देशाला दिशा दाखवणारे शहर आहे. मुंबईच भारताला शक्ती देण्याचे काम करते. मुंबईत अनेक लोक एकत्र मिळून काम करतात, अशा शब्दात मुंबई स्पिरीटपासून ते मुंबईच्या एकसंध असण्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मन भरून कौतुक केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंड येथे आयोजित सभेत ते काल बोलत होते. मुंबईतल्या प्रत्येक भाडेकरूला ५०० चौरस फुटांच्या घराचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. मुंबईतल्या धारावीतल्या सर्वसामान्य गरीबांपासून, कष्टकरी कामगार वर्गासह ते छोट्या व्यापारी वर्गाची मने जिंकण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला.

मुंबईतल्या घरांच्या जागेच्या कळीच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस सरकार २०१९ मध्ये जेव्हा सत्तेत येईल तेव्हा प्रत्येक मुंबईकराला सध्याच्या २५० चौरस फुटाच्या जागेएवजी ५०० चौरस फुटांचे घर देण्यात येईल. अवघ्या १० दिवसात हे काँग्रेस पक्ष करू शकतो. अनेक ठिकाणी दहा दिवसाचे काम अवघ्या २ दिवसातही काँग्रेस सरकारने केले आहे असे ते म्हणाले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या ठिकाणी आम्ही हा पायंडा पाडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतल्या धारावीतल्या छोट्या व्यापारी आणि लघु उद्योगांचांही त्यांनी विशेष उल्लेख केला. धारावीतल्या किती छोट्या उद्योजकांचे कर्ज माफ झाले आहे, असा सवाल त्यांनी केला. मुंबईतल्या तरूणांनी शिक्षणासाठी, छोट्या व्यापारी आणि लघु उद्योजकांनी कर्ज घेतले, त्यांचे कर्ज का माफ झाले नाही, असाही सवाल त्यांनी यावेळी केला. मग देशातल्या फक्त १५ लोकांचे साडेतीन लाख कोटी रूपयांचे कर्ज कसे माफ होते ? मुंबईतल्या छोट्या उद्योजकांचे आणि तरूणांचे काय चुकले असेही त्यांनी यावेळी विचारले. मुंबईतले तरूण हे देशाची शक्ती आहेत. पण करोडो तरूणांसाठी रोजगार देण्यामध्ये मात्र भाजप सरकारला अपयश आल्याचे खापर त्यांनी यावेळी फोडले.

येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा भाजप सरकार सत्तेत येईल तेव्हा काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक गरीबाला किमान वेतनाची हमी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रत्येक जातीधर्माच्या आणि शेवटच्या घटकाच्या बँक खात्यात हा पैसा जमा होईल असे ते म्हणाले. मुंबई हे तुमच्या सर्वांचे शहर आहे. महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसचे सरकार लवकरच येणार आहे. शेतकरी, मजदूर, छोटे दुकानदार, व्यापार्‍यापासून ते काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी या सरकारचे दरवाजे नेहमीच खुले असतील, अशीही त्यांनी हमी यावेळी दिली. मुंबईत अनेक पक्षांची आघाडी होत आहे, काँग्रेसचे दरवाजे आघाडीसाठी नेहमीच खुले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप सरकारने शेतकर्‍याच्या कुटुंबाला १७ रूपये दिवसापोटी दिले आहेत. प्रति माणसी हे अवघे साडेतीन रूपये इतके आहेत. लोकसभेत अवघ्या साडेतीन रूपयांसाठी खासदारांकडून पाच मिनिटे टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत. अंबानीला ३५ हजार कोटी रूपये दिले तेव्हा खासदारांनी का टाळ्या वाजवल्या नाहीत ? नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना पैसे दिले तेव्हा का टाळ्या वाजवल्या नाहीत ? मोदींनी निवडणुकीपूर्वी मोठी मोठी भाषणे ठोकली. पण १५ लाख खात्यामध्ये मिळालेला कुणी इथे आहे का ? असाही खोचक सवाल यावेळी राहुल गांधी यांच्याकडून विचारण्यात आला. नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांचे राज्य चालावे आणि विरोध करेल त्याला दाबून टाकायचे अशाच पद्धतीचे राजकारण आतापर्यंत करण्यात आले आहे, असेही टोला त्यांनी हाणला. मुंबईची सभा होण्याआधी राहुल गांधी यांची धुळे येथे सभा झाली. या सभेला गर्दी होती. तसेच बीकेसी येथील सभेसाठीही एमएमआरडीए ग्राऊंड खचाखच भरले होते.
‘यांच्याशी’ केली राहुल गांधींनी चर्चा!

संजय निरुपम यांचं भाषण सुरू असताना मुंबईतील संभाव्य उमेदवारांना बोलवून राहुल गांधी यांनी चर्चा केली. सुरुवातीला प्रिया दत्त यांना बाजूला बसवून राहुल गांधी यांनी चर्चा केली. त्यानंतर एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदूरकर आणि नंतर मिलिंद देवरा यांच्याशी राहुल गांधी यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे संजय निरुपम यांचे भाषण संपताच राहुल गांधींनी हे ‘मिशन मुलाखत’ थांबवल्याचे पहायला मिळाले.

मुंबई काँग्रेसमध्ये निरूपमविरोध जोरावर!
मुंबई काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे. दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यात वाद होते. मात्र, गुरुदास कामत यांच्या निधनानंतर कामत गटात असणारे एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप, सुरेश शेट्टी यांनी निरूपम हटावची मोहीम सुरु केल्याचं बोललं जात होतं. त्यांनी मध्यंतरी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन निरुपमांना हटण्याची मागणी केल्याचंदेखील समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मुंबई काँग्रेसमधला हा वाद कमी करण्यासाठी ऐन सभा सुरु असतानाच ट्रबल शूटिंग मोडवर गेल्याचं पाहायला मिळालं.

First Published on: March 2, 2019 5:30 AM
Exit mobile version