रेल्वेमंत्र्याची बैठक की जत्रा

रेल्वेमंत्र्याची बैठक की जत्रा

रेल्वेमंत्री पियूष गोयल

मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलेली बैठकीवर खासदार आणि आमदार नाराज झालेत. या बैठकीसाठी आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांना रेल्वेमंत्र्यांनी सुमारे दोन तास ताटकळत ठेवले. ऐवढेच नाही तर बैठकीच्या सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांना भेटत लोकप्रतिनिधीकडे दुर्लक्ष केले. रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीला आपापल्या क्षेत्रातील समस्यांवर अभ्यास करून आलेल्या आमदार आणि खासदारांच्या अशा पाहुणचारामुळे हिरमोड झाला आणि अनेकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.

बैठकिला योग्य नियोजन नव्हते

रेल्वेमंत्र्यानी रीतसर लेखी पत्रक पाठवून मुंबईतील मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आमदार आणि खासदारांना ३१ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत बैठकीसाठी आमंत्रित केल होते. मुंबईत रेल्वेला ‘लाईफलाईन’ मानलं जात असल्याने सर्वच आमदार आणि खासदार आपापल्या परीने समस्यांचा अभ्यास करून दुपारी २ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर दाखल झाले. बैठकीच्या सभागृहाबाहेर असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत लोकप्रतिनिधी सभागृहात दाखल झाले खरे, मात्र तिथेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मंत्री महोदयांच्या साधे दर्शनही लोकप्रतिनिधींना घडले नाही.

सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या रेल्वेशी संबंधित समस्या मंत्री महोदयांकडे मांडता येतील, या अपेक्षेने बैठकीला आलो होतो. मात्र, या बैठकीचं नियोजन व्यवस्थित नसल्याने मंत्री महोदयांना न भेटताच काढता पाय घेतला. – राहुल शेवाळे, खासदार, दक्षिण- मध्य मुंबई

आमदार, खासदार बैठकीतून निघून गेले

कार्यकर्त्यांचा गराडा कमी होईल, या प्रतीक्षेत तासभर बसूनही काही उपयोग नसल्याचे लक्षात आल्यावर खासदार राहुल शेवाळे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे, आमदार मंगेश कुडाळकर यांनी या बैठकीतूनच काढता पाय घेतला. तर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कालिदास कोलमकर हे बराच वेळ ताटकळत बसले होते. सगळ्यात मोठी गोची तर भाजप नेत्यांची झाली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा स्थितीत खासदार गोपाळ शेट्टी, खासदार कपिल पाटील, आमदार राज पुरोहित, आमदार भाई गिरकर तिष्ठत बसले होते.

मुंबई अध्यक्ष जोमात…

या बैठकीत मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार याचा मात्र चांगला पाहुणचार केला. शेलारांसोबत आलेले कार्यकर्ते आणि शेलार यांच्याशी मंत्री महोदयांनी बराच वेळ गप्पा मारल्या.

First Published on: August 31, 2018 6:21 PM
Exit mobile version