बाप्पाला निरोप देताना पावसाची विश्रांती!

बाप्पाला निरोप देताना पावसाची विश्रांती!

गणपती बाप्पाच्या आगमानाला पावसाने हजेरी लावली होती तसेच, दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना पावसाने देखील मुसळधार कोसळून निरोप दिला. मात्र हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरात आज आणि उद्या पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सलग पडणारा मुसळधार पाऊस अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमध्ये विश्रांती घेणार असल्याने जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार असून बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत येणारे विघ्न टळणार आहे.

बाप्पाला देता येणार निर्विघ्न निरोप

अनंत चतुर्दशीला मुंबईत पाऊस उसंत घेतल्याने अनेक गणेशभक्तांसह भाविकांना या विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होऊन बाप्पाला निर्विघ्न निरोप देता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना पश्चिम किनारपट्टी, कोकण परिसरात गणेश विसर्जनादिवशी पावसाच्या तुरळक सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसाच्या विश्रांतीने मुंबईकर सुखावले…

मुंबईत सोमवार नंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंगळवारी मुंबईत एक-दोनदाच पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे सार्वजनिक गणपती बाप्पाच्या दर्शनाकरिता शेवटचे दोन दिवस बाकी असताना गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच, आज-उद्या मुंबईत पाऊस उसंत घेणार असल्याने बाप्पाला आनंदाने निरोप देता येणार आहे.

First Published on: September 11, 2019 8:41 AM
Exit mobile version