Maharashtra Lockdown : ओमिक्रॉनची सेंच्युरी ! लॉकडाऊन कधी ? आरोग्यमंत्री म्हणतात…

Maharashtra Lockdown : ओमिक्रॉनची सेंच्युरी ! लॉकडाऊन कधी ? आरोग्यमंत्री म्हणतात…

आज महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रूग्णांचा आकडा हा शंभरवर पोहचला आहे. याच वेगाने रूग्णसंख्या वाढत राहिली तर तिसरी लाट ही ओमिक्रॉनचीच असेल हे स्पष्टीकरण राज्याचे आरोगमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. ज्या वेगाने ओमिक्रॉनचा संसर्ग आहे, त्यानुसार लॉकडाऊनचे निकषही बदलावे लागतील, असेही मत राजेश टोपे यांनी मांडले. तसेच ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार हे निकष बदलतील असेही राजेश टोपे यांनी संकेत दिले. लहान मुलंच्या लसीकरणाबाबत तसेच बुस्टर डोस देण्याबाबतही राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (rajesh tope update on omicron patient in maharashtra lockdown restriction to curb omicron spread)

सध्या लॉकडाऊनचे निकष लागू करण्यासाठी जेव्हा राज्यातील रूग्णांना ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. पण ओमिक्रॉनचा संसर्गाची गती पाहता, लॉकडाऊन करण्यासाठी ५०० मेट्रिक टनची आवश्यकता जेव्हा भासेल तेव्हाच लॉकडाऊन लावावा लागेल, असाही खुलासा राजेश टोपे यांनी केला. ऑक्सिजनशी संबंधित विषय असल्याने काळजीच्या दृष्टीकोनातून अधिक सतर्कता घेणे गरजेचे आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गासाठी ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. पण सहव्याधी असलेल्या लोकांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजनची गरज भासू शकते असेही टोपेंनी सांगितले.

सगळीकडे निर्बंध लावण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळेच सर्वांनीच सतर्कता बाळगण्याची गरज आहे. काळजीपोटी काही उपाययोजना आपण प्रतिबंधात्मक म्हणून करतो आहोत. त्याचा कुणीही गैरअर्थ कुणीही घेऊ नये. त्याला आरोग्याच्या स्पिरीटने घ्यावे असेही टोपे म्हणाले. शाळा, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणे निर्बंधानुसार सुरू राहतील, असेही टोपे म्हणाले. त्यामुळेच एकाचवेळी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक लोक राहू नये, असे टोपेंनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता निर्बंध पाळले जावेत अशी अपेक्षा आहेत.

राज्यातील नागरिकांमध्ये ८७ टक्के नागरिकांचा पहिला डोस झालेला आहे. जवळपास ५७ ते ५८ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. दररोज राज्यात पाच लाख ते सहा लाख डोस आपण देत आहोत. राज्यात १ कोटी जनतेचा पहिला डोस झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. या गतीने गेल्यास १२ ते १५ दिवसात १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. पण लोकांचा सहभाग त्यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असेही टोपेंनी सांगितले. सातत्याने सूचना देऊन अशा लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याचा आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरण न झालेल्या लोकांची यादी काढली आहे. त्याठिकाणी समुपदेशन करून अशा नागरिकांना लसीकरणात सहभागी करून घेण्याचे आव्हान असल्याचेही टोपे म्हणाले. लसीची उपलब्धतता आणि लस देणारे लोक आहेत. राज्यातील १२ ते १३ लाख लसीकरणाची गती आता ५ लाखांवर आलेली आहे, असे टोपे म्हणाले.

केंद्राकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. आपल्याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे लसीचे डोस शिल्लक आहेत. केंद्राकडून होकार आल्यास राज्य सरकार पुढची स्ट्रॅटेजी ठरवू शकेल. केंद्राने याबाबतचा विचारपूर्वक निर्णय घेऊन कळवण्याची गरज आहे. राज्याकडून बुस्टर डोसची मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

लहान मुलांच्या डोसच्या बाबतीत १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना कळवले आहे. आयसीएमआरच्या ज्या सूचना येतील त्यानुसार लसीकरणाला सुरूवात होईल असेही ते म्हणाले.


 

First Published on: December 25, 2021 3:20 PM
Exit mobile version