घाटकोपरमध्ये ‘वाघा’वरून भाजपचेच नेते आमनेसामने! निवडणुकीत वेगळाच रंग!

घाटकोपरमध्ये ‘वाघा’वरून भाजपचेच नेते आमनेसामने! निवडणुकीत वेगळाच रंग!

अवधूत वाघ वि. राम कदम

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेले असताना आता भाजपा नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. मात्र, हा वाद विधानसभा निवडणुकीचा प्रचार किंवा मतदारसंघातली कामं किंवा स्थानिकांच्या कोणत्याही प्रश्नावर नसून हा वाद आहे घाटकोपरचा असली वाघ कोण? यावरून! घाटकोपरचे आमदार राम कदम आणि भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या सोशल वॉर सुरू झालंय. या ‘वाघ’ मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापसात भिडले आहेत!

काय आहे नेमका हा वाद?

२५ जुलै रोजी राम कदम यांच्या समर्थकांनी ‘घाटकोपरचा एकच वाघ, नकली वाघापासून सावधान’ अशी पोस्ट आपल्या फेसबुकवर राम कदम यांचा फोटो लावून टाकली. त्यानंतर लगेचच अवधूत वाघ यांच्या समर्थकांकडून अवधूत वाघ यांचा फोटो असलेली नवीन पोस्ट करण्यात आली. यामध्ये ‘घाटकोपरचा एकच वाघ, भोंदू रामापासून सावधान’ असं लिहिण्यात आलं होतं. आणि तेव्हापासूनच या दोन्ही पोस्टवरून दोन्ही नेत्यांचे समर्थक कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांसोबत भिडले आहेत.


हेही वाचा – ‘या’ ऐतिहासिक निर्णयाच्या जल्लोषातही सेना भाजपात चढाओढ

घाटकोपरमधून राम कदम आणि अवधूत वाघही इच्छुक!

दरम्यान, २०१४ साली मनसेला सोडचिठ्ठी देत राम कदम यांनी भाजपात प्रवेश करत आमदारकीही मिळवली. मात्र, राम कदम यांची भाषा बघता त्यांच्या उमेदवारीला आता भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडूनच विरोध होत आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ हे देखील घाटकोपर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.

First Published on: August 7, 2019 2:20 PM
Exit mobile version