राणेंचे कट्टर समर्थक कोळंबकर करणार शिवसेनेचा प्रचार

राणेंचे कट्टर समर्थक कोळंबकर करणार शिवसेनेचा प्रचार

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि शिवसेना यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्यांना पाडण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महत्वाची भूमिका बजावेल असे राणेंनी सांगितले. मात्र आता राणेंचे कधी काळचे कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर मुंबईत चक्क शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत. जिथे राणे तिथे कालिदास कोळंबकर असे समिकरण दिसायचे. राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर कोळंबकर यांनी देखील राणेंच्या सोबत जाणे पसंत केले होते.

राहुल शेवाळेंचा करणार प्रचार

नारायण राणेंसोबत शिवसेना सोडलेल्यांपैकी अनेकांनी राणेंची साथ सोडली. मात्र कालिदास कोळंबकर हे कायम राणेंसोबत राहिले. आता मात्र कोळंबकर राणेंपासून दूर होताना दिसत आहेत. त्यामुळेच की काय कोळंबकर आता शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी प्रचार करताना दिसणार आहेत. कोळंबकर हे वडाळा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. हा भाग राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात येतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी कालिदास कोळंबकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयावरील काँग्रेस नेत्यांचे फोटो काढून टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला होता त्यानंतर कोळंबकर भाजपामध्ये जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

कोळंबकर यांचे कार्यकर्ते संभ्रमात

काँग्रेसचे आमदार असलेले सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या जवळ आहेत. तसेच शिवसेनेकडून देखील आपल्याला ऑफर असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यातच आता ते राहुल शेवाळे यांचा प्रचार देखील करणार असल्याची माहिती मिळत असल्याने काळिदास कोळंबकर यांचे कार्यकर्ते संभ्रमात असून, नेमके कालिदास कोलंबकर कुणाचे असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.

राणेंना दिल्या नुसत्या शुभेच्छा

दरम्यान, रत्नागिरी-सिधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचारासाठी कोळंबकर जाणार का? असे त्यांना विचारले असता त्यांनी मी त्यांना इथूनच शुभेच्छा दिल्याचे सांगितले.

‘मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील त्याचे मी पालन करीन. कारण आमच्या पोलीस वसाहतीचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांनी सोडवला आहे. त्यामुळे त्यांनी जर आदेश दिले तर मी युतीच्या उमेदवाराचा प्रचार नक्की करेन. तसेच माझा फायदा युतीच्या उमेदवाराला होईल.’ – कालिदास कोळंबकर, आमदार

First Published on: April 11, 2019 5:00 AM
Exit mobile version