पोलीस अधिकार्‍याचा मोलकरणीवरच बलात्कार

पोलीस अधिकार्‍याचा मोलकरणीवरच बलात्कार

प्रफुल्ल आगवणे (४६)

घरकाम करणार्‍या ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला आणि तिच्या दोन मुलांना कोंडून ठेवणार्‍या कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकार्‍याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दरम्यान विक्रोळी पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या पीडित महिलेची आणि मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

हा खळबळजनक प्रकार शनिवारी रात्री विक्रोळी कन्नमवार नगर येथे घडला असून अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. प्रफुल्ल आगवणे (४६) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून तो कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे राहणार्‍या आगवनेच्या घरी गेल्या एका वर्षांपासून ३१ वर्षीय महिला ही घरकाम करण्यासाठी येत होती. शनिवारी पीडित महिला ही आपल्या दोन मुलांसह पोलीस उपनिरीक्षक आगवणे याच्या घरी घरकाम करण्यासाठी आली होती. दरम्यान आगवणे याने तिला एका एका खोलीत आणून तिच्यावर बलात्कार करून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना घरात कोंडून घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेला होता. पीडित महिलेने तिच्या फोनवरून तिच्या भावाला फोन करून सर्व हकीकत सांगितली, पीडित महिलेच्या भावाने ताबडतोब मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळवले.

मुख्य नियंत्रण कक्षाकडून विक्रोळी पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. विक्रोळी पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन चावी बनवणार्‍याला बोलावून बनावट चावी बनवून घरात बंदिस्त असलेल्या पीडित महिलेची आणि तिच्या दोन्ही मुलाची सुटका कऱण्यात आली. विक्रोळी पोलिसांनी तिच्या तक्ररीवरून पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल आगवणे याच्याविरुद्ध बलात्कार, कोंडून ठेवणे, मारहाण करणे, धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्याला अटक कऱण्यात आली असल्याची महिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे पो.नि. नामदेव शिंदे यांनी दिली.

आरोपी आगवणे हा विवाहित असून त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून दुसरी पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. आगवणे याने या गुन्हातील पीडित महिलेला घरकाम करण्यासाठी ठेवले होते, तिला त्याने लग्नाचे आमिष दाखवून यापूर्वी देखील वारंवार तिच्यावर बळजबरी केली होती, मात्र शनिवारी पीडितेने त्याला बळजबरी करण्यासापासून रोखले असता त्याने तिला मारहाण करीत तिच्यावर बळजबरीने बलात्कार करून ती आणि तिच्या मुलांना घरात कोंडून निघून गेला होता असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी आगवणे याचे दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नीपासून त्याला चार मुले आहेत.

पहिली पत्नी हयात नसून दुसरी पत्नीमुलासह त्याच्यापासून विभक्त राहते. कन्नमवार नगर परिसरात राहणारी३१वर्षीय पीडित महिलेला पतीच्या निधनानंतर आपल्या दोन मुलाचा सांभाळ करण्यासाठी घरकाम करावे लागते. एक वर्षांपासून पीडित महिला ही पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल आगवणे याच्याकडे घरकाम करण्यासाठी येत होती. दरम्यान आगवणे याने तीला तू मुलासह माझ्या घरी रहा, असे सांगितले असता गेल्या काही महिन्यापासून ती आपल्या दोन मुलासह आगवणे याच्या घरचे काम करून तिकडेच राहत होती.

First Published on: May 20, 2019 4:08 AM
Exit mobile version