मुंबईत Remdesivirचा काळाबाजार उघड, सापळा रचून पोलिसांनी केला डॉक्टरांचा पर्दाफाश

मुंबईत Remdesivirचा काळाबाजार उघड, सापळा रचून पोलिसांनी केला डॉक्टरांचा पर्दाफाश

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात सध्या तुटवडा निर्माण झाल आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही होत असल्याचे अनेक वेळा म्हटले गेले आहे. मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १३ एप्रिल रोजी मुंबईच्या मालाड मालवणी या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन MRP किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विकले जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजाराचा पर्दाफाश केला. रिजवान अरिफ गलीभ हुसेन मन्सुरी, सिद्धार्थ केशवप्रसाद आणि चिरंजीवी शिवपूजन विश्वकर्मा अशी तिन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील रिजवान हा पेशाने डॉक्टर आहे. तर एक जण मेडिकल प्रतिनिधी आहे. ते त्यांच्या साथीदारासोबत रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त किंमतीने विकण्याचा धंदा करत होते.

१३ एप्रिलला पोलिसांना मालाड मालवणी, चारकोप नाका या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यासाठी एक माणूस येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक, निगराणी पथक त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाच्या निरिक्षकांना सोबत घेऊन इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरांना पकडण्यासाठी सापळा तयार केला. त्यानुसार संध्याकाळी ७ वाजाताच्या सुमारास एक माणूस रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आला. त्याने एका माणसाला ५०० रुपयांच्या दोन नोटा आणि ५९ हजार रुपये दिल्यानंतर त्या मोबदल्यात ३ रेमडेसिवीर इंजेक्शन दिले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यानुसार त्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने इंजेक्शन पुरवत असलेल्या आपल्या साथीदाराचे नाव सांगितले. तो एक मेडिकल प्रतिनिधी असून तो रेमडेसिवीर इंजेक्शन देतो, थोड्याच वेळात तो पैसे घेण्यासाठी येणार असल्याचे देखिल त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा सापळा रचून डॉक्टरांच्या टोळीचा पर्दाफाश केला.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या होणाऱ्या काळाबाजारामुळे बाजारात इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा – रेमडेसिवीर प्रभावी ठरत असल्याचा पुरावाच नाही

First Published on: April 14, 2021 6:11 PM
Exit mobile version