ख्रिसमस, थर्टी फर्स्टला यंदा ‘फुल्ल नाईट’ पार्टी

ख्रिसमस, थर्टी फर्स्टला यंदा ‘फुल्ल नाईट’ पार्टी

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टॉरंट बार सुरू राहणार आहेत. एवढेच नव्हेतर मद्याची दुकाने अर्थात वाइन शॉपही रात्री १ वाजेपर्यंत खुले राहणार आहे, तशी परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

दारूची दुकाने रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर रात्री १.३० पर्यंत परमिट रूम सुरू ठेवता येतात. परंतु नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. पार्टी करणार्‍यांनी स्वस्त मद्य घेताना सावध राहावे. आरोग्याला हानी करणारे अवैध आणि निकृष्ट दर्जाचे मद्य सेवन करू नये. परवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

मागील दोन निवडणुका ते आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ कोटी रुपयांहून अधिकचे बनावट मद्य जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी अनेकांना अटक करत कारखाने आणि गोदामेही सील केलेली आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रँडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचे प्रशासनाच्या नजरेस आले आहे.

हे बनावट मद्य आरोग्याला हानीकारक आणि मोठे आर्थिक नुकसान करणारे असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच या वर्षांत उत्पादन शुल्क विभागाने २९९ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये ३०६ आरोपींना अटक केली. हातभट्टी, बनावट देशी-विदेशी मद्य, उच्च प्रतीचे मद्य, दमण, गोवा येथील मद्य असा ५२ लाखांचा साठा हस्तगत केला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ६७ जणांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव राज्याच्या पोलीस दलाला पाठविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक सी.बी. राजपूत व दोन उपअधीक्षक यांची दोन तर कार्यकारी निरीक्षकांची नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

…तर पाच हजारांचा दंड
नाताळ आणि नव वर्ष साजरे करताना मद्य सेवन हे परमिट रूम किंवा घरी करावे. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी पार्टी करू नये. मुलांसमोर मद्य सेवन करू नये. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना ५ हजारांचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करताना आढळल्यास दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा नियम आहे.

First Published on: December 23, 2019 5:18 AM
Exit mobile version