रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ लांबणीवर

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ लांबणीवर

कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबई उपनगरातील टॅक्सी-रिक्षा चालक आणि मालकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पार पडलेल्या बैठकीत रिक्षा, टॅक्सी भाडे वाढीच्या प्रस्तावावर चर्चाच झाली नसून पुढच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले. रिक्षाच्या भाड्यात २ रूपये तर टॅक्सीच्या भाड्यात ३ रूपये वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये टॅक्सी, रिक्षा भाडे ऐन कोरोना काळात वाढण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती. कारण अनेक वर्षांपासून टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ झालेली नाही. यातच यंदा कोरोना काळात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रिक्षाला २ रुपये तर टॅक्सीला ३ रुपयांची भाडेवाढ देण्याचा राज्य सरकार विचार करत होते. मात्र, टॅक्सी, रिक्षा संघटना मात्र या कोरोनाकाळात भाडेवाढीसाठी सकारात्मक नव्हत्या.

भाडेवाढ आवश्यक असली तरी, ती आता देऊ नये, कोरोना काळ संपल्यावरच भाडेवाढीचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे टॅक्सी रिक्षा संघटनांचे मत होते. यासंदर्भात टॅक्सी मेन्स युनियनचे ए. एल. क्वाड्रोस, मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे शशांक राव यांनी निवेदनसुद्धा दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावर पुढच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

First Published on: December 23, 2020 6:27 AM
Exit mobile version