केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांची टीका

केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सर्वांना उत्सुकता असलेला अर्थसंकल्प (२०२३-२४) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाची सगळीकडे चर्चा होत असली तरी विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांवर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. ज्या महिला मतदारांच्या जोरावर हे सरकार आले आहे, त्या महिलांचा या सप्तर्षीच्या मुद्द्यात उल्लेख देखील नव्हता जे दुर्दैवी आहे, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा २०२४ च्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून सादर केला गेला आहे. यात फक्त मोठ्या घोषणा आहेत. आज सकाळीच CNG स्वस्त केला आहे. हे सगळ आगामी निवडणुकांसाठीच आहे. मध्यम वर्गाला, कर भरणाऱ्या नोकरदार वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून Tax Slab मध्ये बदल केले गेले आहेत, पण Old & New Regime अशा शब्दांचा गोंधळ घालत फक्त घोषणा केल्या आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना अशी घोषणा केली गेली आहे. यात दोन लाखाची गुंतवणूक केल्यास वार्षिक ७.५०% व्याज महिलांना देण्यात येणार आहे, अशी तरतूद करण्यात आली आहे. परंतु यावर रुपाली चाकणकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत चाकणकर म्हणाल्या की, किती महिला स्वतः निर्णय घेऊन वर्षाला दोन लाख गुंतवू शकतात? वर्षाला दोन लाख म्हणजे दर महिन्याला साधारण 17 हजार होतात एवढी गुंतवणूक करू शकणाऱ्या महिला किती आहेत? फक्त लोकप्रिय, मोठ्या घोषणांना अर्थ नाही.

दरम्यान, दीनदयाल अंत्योदय योजनेत ग्रामीण भागात ८१ लाख बचतगट केल्याचे सांगितले, पण या महिलांना ठोस अर्थसहाय्य देण्याबाबत काही घोषणा झालेली नाही. तसेच कोविडचा भयंकर काळ आता आपण मागे सोडला आहे. आता एकल महिला, त्यांचा रोजगार, असे प्रश्न समोर आहेत, पण याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. या अर्थसंकल्पात रोजगाराचा काहीही उल्लेख नाही, याआधी दरवर्षी २ कोटी रोजगार द्यायच्या घोषणा केल्या गेल्या, त्याचे काय झाले ते आपण पाहतोच आहे, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

First Published on: February 1, 2023 4:55 PM
Exit mobile version