केईएम रुग्णालयाची लिफ्ट बंद; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

केईएम रुग्णालयाची लिफ्ट बंद; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असलेली ‘लिफ्ट’ सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या लिफ्टची सुविधा देणाऱ्या व देखभाल दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मुद्दामच ही लिफ्ट बंद ठेवण्यात येत आहे, असा गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे. तसेच, सदर प्रकरणी सखोल चौकशी करून त्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी सचिन पडवळ यांनी स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केली आहे. यावेळी, त्यांच्या सोबत माजी नगरसेविका सिंधुताई मसुरकर या उपस्थित होत्या.

या संपूर्ण घटनाप्रकाराची माहिती देताना सचिन पडवळ म्हणाले की, गुरुवारी सकाळच्या सुमारास मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे केईएम रुग्णालयाच्या सीव्हीटीसी इमारत येथे आले असता सदर इमारतीमधील दोन पैकी एक लिफ्ट बंद असल्याचे समजले. त्यावर त्यांनी यासंदर्भामध्ये अधिक चौकशी केली असता ही लिफ्ट खूप दिवसापासून बंद असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी के.ई.एम.रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेतली व त्यांच्याकडे बंद लिफ्टबाबत तक्रार केली.

केईएम रुग्णालयात लिफ्टची सुविधा पुरविणाऱ्या कंपनीकडेच देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. या कंपनीला रूग्णालय व्यवस्थापन नियमितपणे बिल अदा करते. मात्र तरीही या बिला संधर्भात त्यांचा प्रशासनाबरोबर काही वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, सदर कंपनी रुग्णावर राग काढत आहे व यासाठी कंपनीचा प्रतिनिधी नेहमी येऊन त्यांच्या ताब्यात असलेल्या सीव्हीटीसी इमारतीच्या टेरेसवरील केबिनमध्ये जाऊन प्रशासनाने चालू केलेली लिफ्ट बंद करतो. या कृतीद्वारे प्रशासनावर दबाव टाकण्याचा सदर कंपनीचा प्रयत्न करीत आहे, अशी धक्कादायक माहिती मिळाल्याचे सचिन पडवळ यांनी सांगितले.

ही गंभीर बाब त्यांनी, शिवसेना विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर व शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या कानावर घातली. त्यांच्या सूचनेनुसार सचिन पडवळ व स्थानिक नगरसेविका सिंधुताई मसुरकर यांनी भोईवाडा पोलीस ठाणे येथे जाऊन वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र पवार यांची भेट घेतली. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार करून सदर कंपनीची चौकशी करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली.

सदर कंपनीच्या या गंभीर कृत्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांचा जीव देखील जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. पोलिसांनी अपेक्षित कारवाई करून रुग्णालयाची लिफ्ट कायमस्वरूपी नियमित चालू करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी, लवकरच या सर्व विषयाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सचिन पडवळ यांनी सांगितले.


हेही वाचा : 145 आमदारांचं पाठबळ असेपर्यंत हे सरकार टीकेल, अजित पवारांचा टोला


 

First Published on: August 25, 2022 9:10 PM
Exit mobile version