‘हू किल्ड करकरे’?…हेमंत करकरेंच्या मृत्यूमागचे गंभीर मुद्दे!

‘हू किल्ड करकरे’?…हेमंत करकरेंच्या मृत्यूमागचे गंभीर मुद्दे!

हू किल्ड करकरे पुस्तकात करकरेंच्या मृत्यूवर गंभीर प्रश्नचिन्ह

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून देशभरात संताप व्यक्त होऊ लागला आहे. तसेच, साध्वी प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी रद्द केली जावी अशी मागणी देखील आता पुढे येऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहीद हेमंत करकरे यांचा २००८ मालेगाव तपास आणि त्यानंतर मुंबई हल्ल्यादरम्यान त्यांचा झालेला मृत्यू, या भोवती मुंबतील वरिष्ठ पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी २००९ साली लिहिलेल्या पुस्तकावर पुन्हा चर्चा सुरू झाली.

काय म्हणाल्या प्रज्ञा सिंह?

‘हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असून त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवले. ते देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते अशी वादग्रस्त टीका साध्वींनी केली.

हिंदू दहशतवाद..किती सत्य, किती असत्य?

ज्या सप्टेंबर २००८ मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह अटकेत होत्या, त्या प्रकरणाचा तपास हेमंत करकरे करत होते. ‘मालेगाव बॉम्बब्लास्टच्याही आधी म्हणजे २००२पासून झालेल्या दंगली आणि बॉम्बब्लास्टमधून मुस्लीम दहशतवादाची संकल्पना रूढ करण्यात आली. मात्र, मालेगाव बॉम्बस्फोटांच्या माध्यमातून पहिल्यांदाच हिंदू दहशतवादाची सूत्र पोलिसांच्या हाती आली’, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. त्याचा तपास करत होते हेमंत करकरे. यातूनच हेमंत करकरेंनी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, दयानंद पांडे यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली. तिथेच, ‘हेमंत करकरेंनी चुकीच्या पद्धतीने मला या प्रकरणात अडकवलं’, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी शाप नाही दिला, त्यांनी कट करून मारलंय करकरेंना. आणि प्रज्ञा सिंह यांच्याविरोधातले पुरावे कोर्टासमोर सादर झाले आहेत. त्यामुळे करकरेंनी त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवलं हे चुकीचं आहे. २००९मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत त्यावर स्पष्टीकरण आलेलं नाही.

एस. एम. मुश्रीफ, माजी आयपीएस अधिकारी

मुश्रीफांच्या पुस्तकात गंभीर प्रश्न आणि त्याचे पुरावे!

मात्र, असं असलं, तरी मुश्रीफ यांचं ‘हू किल्ड करकरे’ हे पुस्तक मात्र वेगळंच वास्तव समोर मांडतं. हे पुस्तक ऑक्टोबर २००९मध्ये प्रकाशित झालं. म्हणजेच, हेमंत करकरे शहीद झाल्यानंतर वर्षभरानं प्रकाशित झालं. हेमंत करकरेंचा मृत्यू कसा संशयास्पद परिस्थितीत झाला, त्यासाठी आरएसएस, अभिनव भारत आणि इतर हिंदुत्ववादी संघटना कशा पद्धतीने तयारी करत होत्या, त्यासंदर्भातले कोणते पुरावे २००८ मुंबई हल्ल्याच्या तपासादरम्यान समोर आले यासंदर्भात सविस्तर दावे या पुस्तकात करण्यात आले आहेत. तसेच, हेमंतर करकरेंनी कर्नल पुरोहित आणि दयानंद पांडे यांचे जप्त केलेले ३ लॅपटॉप कसे गायब करण्यात आले याचाही गोषवारा एस. एम. मुश्रीफ यांनी या पुस्तकात दिला आहे.


हेही वाचा – साध्वी, जनतेचा शाप तुला लागणार, अन् तू हरणार !

पुस्तकावरची चर्चा दडपली गेली?

आपण पुस्तकार केलेले दावे सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली, तरी त्यासाठी माझी तयारी असल्याचं एस. एम. मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं. मात्र तरीदेखील हिंदू दहशतवाद या संकल्पनेवर आधारित दावे आणि कथित पुरावे देणाऱ्या या पुस्तकावर फारशी चर्चा झाली नाही. तशी चर्चा जाणून बुजून घडवून आणली नाही, असा देखील दावा केला जातो. या सगळ्याच्या पाठिशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची अभिनव भारत ही संघटना असल्याचाही दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

First Published on: April 19, 2019 7:01 PM
Exit mobile version