‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणणारे संदिप देशपांडे ट्विटरवर ट्रोल

‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणणारे संदिप देशपांडे ट्विटरवर ट्रोल

मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे हे आता रोज ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अश्वदलाचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले होते. संदीप देशपांडे यांनी मात्र ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयावर टीका करणारे ट्विट केले आहे. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत देशपांडेंनी टीका केली खरी, मात्र ट्विटरकरांनी उलट देशपांडे यांचीच कानउघाडणी केली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “जग घोड्यावरुन चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं. “उद्धवा अजब तुझे सरकार” असे ट्विट देशपांडे यांनी केले. २३ जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे आपली स्वतंत्र विचारधारा मांडणार आहे. त्याआधीपासूनच मनसेने सरकारविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. संदीप देशपांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत सरकारवर टीका करत आहेत. मात्र ट्विटरवरील युजर्सनी यावेळी देशपांडे यांना खडे बोल सुनावले आहेत.

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल कार्यरत होणार, अशी घोषणा केली होती. सध्या मरोळ येथे अश्वदलातील पोलिसांचे घोडेस्वारीचे प्रशिक्षण सुरु आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्कवरील ध्वजारोहणाच्या मुख्य संचलनात हे अश्वदल कार्यरत होईल. अश्वदलात एकूण ३० अश्व असणार आहेत.

वाहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी गस्त, समुद्रकिनारी किंवा गर्दीच्या ठिकाणी गस्त, आंदोलनांवर करडी नजर ठेवणे अशा प्रकारची कामे अश्वदलाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सुरुवातील फक्त मुंबई शहरातच अश्वदल कार्यरत असेल, त्यानंतर गरज पडल्यास इतर शहरांमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येणार आहे.

First Published on: January 22, 2020 10:02 AM
Exit mobile version