“पटलं तर घ्या, नाही पटलं तर..” संदीप देशपांडेंचे राऊतांना पत्र

“पटलं तर घ्या, नाही पटलं तर..” संदीप देशपांडेंचे राऊतांना पत्र

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला जोरदार धक्का मिळाले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात मंगळवारी याचिका दाखल करण्यात आली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज (ता. २२ फेब्रुवारी) दुपारी ३.३० वाजता सुनावणी करण्यात येणार आहे. पण निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर ठाकरे गटाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आरोप केले. निवडणूक आयोगाने दोन हजार करोड रुपये घेऊन हा निर्णय दिल्याचा गंभीर आरोप राऊतांकडून करण्यात आला. ज्यामुळे चौफेर बाजुंनी राऊतांवर टीका करण्यात आली. यामध्ये आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा उडी घेतली आहे. संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका करत त्यांना सल्ला देणारे पत्र लिहिले आहे. “पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !” असे त्यांनी या पत्राच्या शेवटी लिहिले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याआधी सुद्धा शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीला संजय राऊत यांना जबाबदार ठरवले होते. संजय राऊत हे कायम एका वाचाळवीरासारखे काहीही बोलत सुटतात, असेही देशपांडे यांच्याकडून अनेकदा बोलण्यात आले आहे. पण आता तर थेट देशपांडेंनी राऊतांना पत्रच लिहिले आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरला शेअर देखील केले आहे.

संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना लिहिलेले पत्र
आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !
हे येडंxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

देशपांडेंनी पुढे लिहिले आहे की, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !
आपला नम्र,
संदीप देशपांडे

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांवर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी सुद्धा टीका केली होती. सततच्या पत्रकार परिषदा आणि त्यात काहीही बोलणे यामुळेच शिवसेना संपली असा आरोप देखील संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. तर काही थेट राऊत यांच्यामुळे आम्ही पक्ष सोडत असल्याचे देखील सांगितले आहे.

First Published on: February 22, 2023 11:04 AM
Exit mobile version