आईच्या समाधानासाठी केली कोरोना टेस्ट

आईच्या समाधानासाठी केली कोरोना टेस्ट

दहिसरमध्ये सुरुवातीला रुग्ण संख्या नियंत्रणात आणली असली तरी, तसंच सर्व भागांमध्ये आता हा आजार नियंत्रणात येत असताना पुन्हा या भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येवू लागले. मात्र, या भागात कोरोनाच्या उपाययोजना राबवणाऱ्या आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनाही कोरेानाने हुलकावणी दिली होती. आधी विभागातील अभियंता व इतर अधिकारी कोरोनाबाधित निघाले तोवर बिनधास्त असणाऱ्या नांदेडकर या, जेव्हा वाहनचालक आणि कार्यालयातील शिपायालाच कोरोना होताच बिथरल्या होत्या. परंतु आपल्याला लक्षणे नसल्याने त्यांनाही चाचणी करून घेण्याची इच्छा झाली नाही. परंतु घरात ७० वर्षीय आई असल्याने केवळ तिच्या समाधानासाठी त्यांची कोरोनाची चाचणी केली आणि सुदैवाने तो अहवाल निगेटिव्ह आला.

दहिसरमध्ये मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. अंबावाडीत राहणारी एक व्यक्ती नाशिकला लग्न आटोपून आली होती. त्यांना पहिली बाधा झाली. परंतु त्यानंतर विभागाने काळजी घेत मे महिन्यापर्यंत बाधित रुग्णांची संख्या वाढू दिली नाही. परंतु मग पुढे अंबावाडीसह केतकीपाडा, रावळपाडा व नंतर गणपत पाटील नगरने जी काही संख्या वाढायला सुरुवात केली. त्यामुळे दहिसरमध्ये ही संख्या वाढत असली तरी इतर विभागांच्या तुलनेत अजुनही हा विभाग कोरोनाबाधित रुग्णांच्या क्रमवारीत खालून चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत १६३१ रुग्ण बरे झाले असून ७५२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर ९८ रुग्णांचे मृत्यू झाले आहे. मागील चार महिन्यापासून महापालिकेच्या आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय अधिकारी, इमारत व कारखाने विभाग, तसेच नॉन टेक्निकल स्टाफने उत्तमपणे काम करत यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे नेतृत्व करत असतानाच नांदेडकर यांनाही कोरोनाने भीती घातली होती. त्या म्हणणात, घरात ७० वर्षी आई असल्याने आणि मी बाहेर प्रत्येक ठिकाणी फिरुन आल्यानंतर याचा संसर्ग तिला होणार नाही ना याची भीती वाटत होती. सुरुवातीला तशी भीती वाटत हेाती. पण पुढे आत्मविश्वास वाढू लागला. तशी माझी आई खंबीर आहे. घरात गेल्यांनतर एकदा वॉश केले आणि सर्व वस्तू सॅनिटाईज केल्यानंतर मी आईशी थोडे अंतर ठेवून बोलायची. पण नेहमीही स्वतंत्र खोलीत राहिली. घरात आणलेल्या कोणत्या वस्तूला २४ तास हात लावायचा नाही. आणि त्यातच मी माझ्या वस्तू कुणाच्या हाती देत नव्हते. त्यामुळे आपली आपणच काळजी घेतली तर कोरोनापासून बचाव करता येवू शकतो, असे त्या म्हणतात.

विशेष म्हणजे नांदेडकर यांचे वाहनचालक व कार्यालयातील शिपाई एकाच वेळी कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी त्यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागली होती, याबाबत त्या सांगतात. माझ्या कार्यालयात सर्वात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुण असलेला कर्मचारी म्हणजे किटक नाशक विभागातील कामगार. त्यानंतर जी सुरुवात झाली ती मग इतर कर्मचारी,अभियंते पॉझिटिव्ह निघू लागले होते. परंतु एके दिवशी माझा वाहन चालक आणि शिपाईसुध्दा पॉझिटिव्ह निघाला. मात्र, त्यावेळी आपल्या आसपास अदृश्य कोरोनाचे रुग्ण असू शकतात, याची खात्री पटली आणि त्यादिवसापासून मी माझा जेवणाच्या डब्यासह सर्व साहित्य स्वत:च हाताळू लागले. शिपाई आणि वाहनचालक पॉझिटिव्ह आले असले तरी मला काही लक्षणेच दिसत नसल्याने माझी काही ही टेस्ट करण्याची इच्छा नव्हती. मला काही होणार नाही असे आईला वाटत असेल तरी तिची इच्छा होती. काही असेल तर प्राथमिक उपचार केले जातील, असे ती म्हणायची. त्यामुळे मग आईच्या इच्छेखातर आणि तिच्या समाधानासाठी मी चाचणी केली आणि त्यानंतर तिचा अहवालही निगेटिव्ह आला.

घर आणि ऑफिस अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या नांदेडकर या सकाळी आईचा स्वयंपाक करून दहिसरकरांच्या सेवेत रुजू व्हायच्या. त्यानंतर संपूर्ण वेळ कार्यालयातच जायचा. अधूनमधून आईची विचारपूस करायलाही त्यांना वेळ नसायचा. घरी गेल्यानंतर जेवण व सकाळचा नाश्ता करताना जो काही वेळ मिळायचा तो आईशी संवाद करण्यात घालवायच्या, असे त्या सांगतात. आपले सहकारी पॉझिटिव्ह निघत असले तरी इतर कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही भीती निर्माण होवू दिली नाही. विशेष म्हणजे आम्ही घनकचरा विभागाच्या चौक्यांवर जावून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग कशाप्रकारे रोखता येईल, त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याची जनजागृती केली होती. आणि जर तुम्ही पाहिलत माझ्या विभागातील प्रत्येक सफाई कामगार सुरक्षित आहे. आमचे काही इंजिनिअरही पॉझिटिव्ह निघाले. कारण त्यांना वारंवार कंटेनमेंट झोनमध्ये जावे लागायचे. मी आणि आमचे उपायुक्त विश्वास शंकरवार साहेब यांच्यासह वारंवार कंटेनमेंट झोनची पाहणी, क्वारंटाईन सेंटरची पाहणी आदींसाठी विभागात फिरून लक्ष देत असतो. माझा सर्व स्टाफ खूप प्रशिक्षित आणि समझदार तर आहेतच, शिवाय प्रत्येक जण कर्तव्यभावनेने काम करत असल्याने तसेच विभागातील लोकप्रतिनिधींची वारंवार मिळणारी साथ यामुळेच याचा संसर्ग रोखण्यात आम्ही यशस्वी ठरत असल्याच्या भावना त्या व्यक्त करतात. त्यामुळे पुढील १५ दिवसांमध्ये नॉन स्लमध्येही हे प्रमाण कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

First Published on: July 22, 2020 4:02 PM
Exit mobile version