…सेनेचे राऊत म्हणतात; राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा

…सेनेचे राऊत म्हणतात; राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा

‘ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील जिंकून यावे’, अशी इच्छा राऊत यांनी व्यक्त करत त्यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राऊत अडचणीत आले आहेत. भांडुप सुभाष नगर एसआरए प्रकल्पच्या कार्यक्रमात विक्रोळीतील शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना शुभेच्छा दिल्याचा यांचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे कोटक यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या शुभेच्छा दिल्याने हा व्हिडीओ अधिकच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राऊत यांना खुलासा करण्यासाठी नवीन व्हिडिओ व्हायरल करण्याची वेळ आली आहे.

नेमके काय घडले?

गुढीपाडव्याच्या दिवशी भांडुप सुभाष नगर येथील विकासकाच्या वतीने भास्कर विचारे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संजय पाटील हेही उपस्थित होते. राऊत यांनी पाटील यांना दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे वेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सुनील राऊत यांची धमकी

शिवसेनेने किरीट सोमय्या यांना विरोध केल्याने ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात सेना-भाजपमध्ये तणाव होता. किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर स्वतः निवडणूक लढवण्याचा धमकी वजा इशारा सुनील राऊत यांनी दिला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. पण मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राऊत त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पण राऊत यांच्या सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने ईशान्य मुंबईत युतीत पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

शिवसेना-भाजप युती मजबूत राहील

या पार्श्वभूमीवर सुनील राऊत यांनी समाजमाध्यमांवर स्वतःच्या खुलाशाचा व्हिडीओ अपलोड केला. यावर राऊत यांनी खुलासा करताना म्हटले की, कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता शिवसेना-भाजप युती अशी मजबूत राहील यासाठी काम करा. उमेदवार मनोज कोटक हे लाखोंच्या मतांनी जिंकून येतील. मी आपल्यासोबत आहे. आपली मराठी संस्कृती आहे की, आपल्या विरोधकांना शुभेच्छा देतो. तो एक खाजगी कार्यक्रम होता. व्याससपीठावर संजय पाटील अचानक समोर आले आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यापलीकडे यात काहीही नाही. आम्ही मनापासून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचे काम करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: April 12, 2019 12:22 PM
Exit mobile version