‘लॉकडाऊन’नंतर शैक्षणिक शुल्क भरा; अध्यादेशानंतरही शाळांकडून शुल्काची मागणी

‘लॉकडाऊन’नंतर शैक्षणिक शुल्क भरा; अध्यादेशानंतरही शाळांकडून शुल्काची मागणी

राज्यातील खासगी तसेच केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून पालकांना येत्या शैक्षणिक वर्षाची ऑनलाइन फी भरण्याच्या सूचना तसेच फोन येत आहेत. शाळांनी कोणत्याही प्रकारची फी भरण्याची सक्ती या काळात करु नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे दिल्या आहेत. यानंतरही शाळांकडून सरकारचे आदेश धाब्यावर बसवत शुल्कवसुली सुरू आहे. तर लॉकडाऊननंतर फी भरण्याचे आदेश विभागाने दिल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षण विभागाच्या भूमिकेने पालकांमध्ये संताप

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बोर्डाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील. या संपूर्ण कालावधीमध्ये सदर फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने केल्या आहेत. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने जारी केला आहे. या अध्यादेशानंतरही अनेक शाळांनी पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. यामुळे पालकांकडून शाळा आणि सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात शाळांनी लॉकडाऊन नंतर शुल्क वसूल करावे, अशा सूचना दिल्या आहेत. याला पालक संघटना आणि पालकांनी कडाडून विरोध केला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांचा रोजगार संकटात आला आहे. यामुळे लॉकडाऊन संपताच पालक लगेच कसे काय शुल्क भरू शकतील, असा सवाल पालकांनी व्यक्त केला आहे.

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शुल्क घेण्याचा आदेश दिला आहे. परंतु हातात पैसे नसताना पालक शुल्क कसे भरणार? हा प्रश्न आहे. पालकांना ही रक्कम भरण्यासाठी वेळ द्यायला हवा. – प्रसाद तुळसकर, पालक


हेही वाचा – धक्कादायक! अनेकांना ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’द्वारे कोरोना


 

First Published on: March 31, 2020 5:34 PM
Exit mobile version