‘मुंबईत कलम 144 लागू’ ही चुकीची माहिती, विश्वास नांगरे पाटलांचा खुलासा

‘मुंबईत कलम 144 लागू’ ही चुकीची माहिती, विश्वास नांगरे पाटलांचा खुलासा

मुंबईत कलम 144 लागू करण्यात आल्याने एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून ही बातमी खोटी असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. (Section 144 applied in Mumbai is wrong information Joint Commissioner of Police in Mumbai City Vishwas Nangre Patil disclosure)

मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. “मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांकडून सीआरपीसी 144चे जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत, अशी बातमी येत आहे. ही बातमी चुकीचा आणि गैरसमज निर्माण करणारी आहे. मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलीस अॅक्ट ३७ १/३ अन्वये जी लोक बेकायदेशीरपणे मोर्चे, निदर्शने काढू इच्छितात. जी लोक कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा निर्माण करून जमावू इच्छितात, त्यांच्याविरुद्ध दर १५ दिवसाला आदेश काढले जातात. वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३४१ दिवस हे आदेश जारी केलेले असतात”, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

“या आदेशांचा लोकांच्या सर्वसामन्य जीवनाशी काहीही संबंध नाही. जे पारिवारीक, राजकीय, सामजिक, मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम असतात ते सर्व शांततापूर्ण कार्यक्रम यातून वगळण्यात आलेले आहे. तसेच, यामधून संभ्रम निर्माण करू नये”, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो…’, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

First Published on: December 3, 2022 5:46 PM
Exit mobile version