विद्यापीठाच्या विधी विभागाकडून विद्यार्थिनीना स्वरक्षणाचे धडे

विद्यापीठाच्या विधी विभागाकडून विद्यार्थिनीना स्वरक्षणाचे धडे

मुंबई विद्यापीठ

महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले, असुरक्षित वातावरण या पार्श्वभूमीवर 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विधी विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडमधील विधी व अन्य कॉलेजांमधील विद्यार्थिनींना कायद्याच्या माहितीबरोबरच स्वरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत.सध्या महिला अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना रात्रीअपरात्री घरी एकटे जावे लागते किंवा अनोळखी व्यक्तींसोबत प्रवास करावा लागतो अशावेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. बर्‍याचदा पुरुषांकडून त्यांची छेड काढण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने महिला सक्षमीकरणासाठी विशेष पाऊल उचलले आहे.

त्यासाठी त्यांनी मुंबई व आसपासच्या कॉलेजमधील विद्यार्थिनींना सक्षमीकरणाचे धडे देण्यासाठी विशेष कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. महिला सबलीकरणासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांची सध्या फार गरज आहे. अशा प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संकटकाळी महिलांना स्वत:चे संरक्षण करता येऊ शकते, अशी माहिती विधी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी दिली.

विधी विभागातर्फे महिला प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच मुंबईतील के.सी.कॉलेजमध्ये झाला. यावेळी कॉलेजमधील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या विरोधात वाढलेल्या अपराधांमुळे अशा प्रकारच्या कार्यशाळांची गरज अधोरेखित होत असल्याचे मत यावेळी के.सी. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. कविता लालचंदानी यांनी मांडले. कार्यशाळेचे प्रशिक्षक शिवाजी पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी उत्तम प्रकारे प्रात्याक्षिके दाखवून विद्यार्थिनींना स्वरंक्षणाचे धडे दिले. विशेषत: अचानक झालेल्या हल्ल्यांमध्ये कशारितीने स्वत:चा बचाव करता येऊ शकतो हे देखील समर्पकपणे दाखवून दिले.

First Published on: January 17, 2020 1:15 AM
Exit mobile version