जेष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

जेष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

लोकमत, इंडियन एक्स्प्रेस समूहात अनेक वर्षे पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी पत्रकारितेत ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिले.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोना झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला मात्र फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. औषधोपचार करण्यात आले, मात्र त्याचा काही फायदा होत नव्हता. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून जास्त अनुभव होता. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीचे चीफ रिपोर्टर, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांना पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.


 

First Published on: January 21, 2022 10:06 AM
Exit mobile version