सेव्हन हिल्स रुग्णालयात होणार आता स्वर यंत्र आणि स्वर नलिकेतील त्रासावर उपचार

सेव्हन हिल्स रुग्णालयात होणार आता स्वर यंत्र आणि स्वर नलिकेतील त्रासावर उपचार

सेव्हन हिल्स रुग्णालयात स्वर यंत्र आणि स्वर नलिकेतील त्रासावर होणार उपचार

मुंबई महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात जागतिक स्वरदिन निमित्ताने १६ एप्रिल रोजी मोफत व्याख्यान व स्वर तपासणी केली जाणार आहे. एवढेच नव्हे स्वरयंत्र आणि स्वर नलिकेविषयक आरोग्य समस्या भेडसावत असलेल्या नागरिकांसाठी १८ ते २३ एप्रिल या कालावधीत सवलतीच्या दरात स्वर तपासणी, उपचार व आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. १६ एप्रिल रोजी “मेरी आवाजही पहेचान है” या कार्यक्रमा अंतर्गत दुपारी १२ ते १ या वेळेत मार्गदर्शनपर व्याख्यान होणार असून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विनामूल्य स्वर तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोविड कालावधीनंतर स्वर यंत्र व स्वर नलिकेत ज्यांना त्रास जाणवत आहे, त्यांना पालिकेच्या सेव्हन हिल्समधील या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सेव्हन हिल्स रुग्णालयात नुकतेच वेलनेस सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोविड विषाणू संसर्गाची स्थिती संपूर्णपणे आटोक्यात आली असली तरी मागील दोन वर्षात कोविड बाधा झालेल्या अनेक नागरिकांना आता कोविड पश्चात कालावधीत आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. अशा रुग्णांना आपली संपूर्ण किंवा आवश्यक ती आरोग्य तपासणी सवलतीच्या दरात करून घेण्यासाठी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून एकाच छताखाली सुविधा प्राप्त झाली आहे. कोविड बाधेतून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये स्वर नलिका आणि स्वरयंत्र यामध्ये आरोग्य समस्या निर्माण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातून बोलताना, उच्चारताना अडथळे जाणवतात. अशा रुग्णांसाठी तपासणी, उपचार आणि आवश्यकता असेल तर शस्त्रक्रिया देखील सेव्हन हिल्स रूग्णालयात सवलतीच्या दरात होवू शकते.

तसेच, मागील दोन वर्षात कोविड बाधेतून यशस्वीपणे बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना आता स्वर विषयक आरोग्य समस्या जाणवत आहेत. अश्या रुग्णांना स्वर विषयक तपासणी करून घेता यावी, योग्य उपचार मिळावेत आणि गरज असेल तर शस्त्रक्रिया देखील करता यावी, ह्या सर्व आरोग्य सुविधा सवलतीच्या दरात आणि एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात १८ ते २३ एप्रिल या कालावधीत स्वर उपचार सप्ताह राबवला जाणार आहे. यामध्ये दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित रुग्ण येवू शकतात, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
स्वर विषयक समस्यांनी त्रासलेल्या रुग्णांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधावा आणि तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सेव्हन हिल्सचे अधिष्ठाता बाळकृष्ण अडसूळ आणि विशेष कार्य अधिकारी महारुद्र कुंभार यांनी केले आहे.


‘छेडेंगे तो छोडेंगे नही’, मशिंदींवरील भोंग्यांवरुन मुस्लिम संघटना PFIची मनसेला धमकी

 

First Published on: April 15, 2022 9:11 PM
Exit mobile version