विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालिकेच्या सात हजार शिक्षकांना प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालिकेच्या सात हजार शिक्षकांना प्रशिक्षण

संग्रहित छायाचित्र

 

मुंबई: शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या भयानक व जीवघेण्या व्यसनांपासून चार हात दूर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने मंगळवारी पालिकेच्या ७ हजार शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मौलिक मार्गदर्शन केले.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी हे देशाचे पुढील भविष्य आहेत. मात्र हेच विद्यार्थी वाईट व्यक्तींची संगत लागल्यास लहान वयातच विविध व्यसनांच्या आहारी जाऊन व्यसनी होऊ शकतात. त्यांना आरोग्यासाठी घातक असलेले विविध अंमली पदार्थ, त्यांच्या सेवनाचे दुष्परिणाम, अंमली पदार्थांचे व्यसन टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यांबाबत मुंबई पोलीस, तज्ज्ञांमार्फत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षक हे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात चांगले शिक्षण देऊन घडवितात. हे विद्यार्थी व्यसनांपासून चार हात लांब रहावेत यासाठी शालेय जीवनात त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना एक चांगले नागरिक घडविण्यासाठी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन पोलीस खात्याच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंगळवारी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महापालिकेचे सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी मार्गदर्शन केले.

तसेच महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त वतीने आयोजित व ‘स्टार्स’ प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उद्घाटन मेळावा मंगळवारी पालिकेच्या वरळी सी फेस महानगरपालिका शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे.

महाराष्ट्र राज्याला शिक्षणाची दीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रिबाई फुलेंसारखे आदर्श घरोघरी निर्माण करण्याचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

First Published on: April 25, 2023 10:56 PM
Exit mobile version