शरद पवारांचा दाऊदशी संबंध, नितेश-निलेश राणेंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

शरद पवारांचा दाऊदशी संबंध, नितेश-निलेश राणेंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

शरद पवारांचे दाऊद इब्राहिमशी संबंध! राणे बंधूंविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात टीका करत त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध जोडल्यप्रकरणी माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणेंविरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडतील असं भाष्य केल्याचे एफआयआर कॉपीत नोंद आहे. एफआरआय कॉपीमध्ये नमूद करण्यात आले की, नितेश राणे यांनी आझाद मैदानातील भाषणात नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला अशा सवाल शरद पवारांना केला. मात्र राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. तरी देखील अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आली नाही असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. त्यामुळे नितेश राणे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच निलेश राणे यांनी शरद पवार हे दाऊदचा माणूस आणि पाकिस्तानचा एजंट असल्याचं ट्विट केलं होतं. तर निलेश राणे यांनी म्हटले की, मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीसोबत व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. अस तक्रारीत म्हटले आहे.

नितेश राणे आणि निलेश राणे हे जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करून तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसान करत आहेत. तसेच दाऊदशी संबंध जोडल्याने पवारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. असंही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे?

निलेश राणे यांनी सिंधुदुर्गातील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे म्हटले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला होता. ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिकांना पाठीशी घालता, पण अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घेता, नवाब मलिक यांच्याशी तुमचे काय संबंध आहेत? नवाब मलिक शरद पवारांचा कोण लागतो? पवार कुटुंबीयांसाठी नवाब मलिक काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवारांबद्दलची सर्व माहिती उघड होईल, अशी भीती आहे? असा मला संशय वाटतो, नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही, हे पवारच सांगतील, अशी टीका देखील नितेश राणे यांनी केली होती.


Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची आज राहत्या घरी पोलीस चौकशी, भाजपकडून राज्यभरात आंदोलनाचा इशारा


First Published on: March 13, 2022 10:15 AM
Exit mobile version