पडद्याआडचे पगडीआख्यान

पडद्याआडचे पगडीआख्यान

फोटो सौजन्य पुणे मिरर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात ‘पुणेरी पगडी’ घालू नका तर जोतीराव फुलेंचे ‘पागोटे’ घाला, असे फर्मान कार्यकर्त्यांना दिले. पवारांच्या या कृतीमागे नेहमीप्रमाणे सोशल इंजिनिअरिंगचे गृहितक असल्याचे मानले जातेय. कदाचित ते असेलही. पण पवार एखादी कृती आधीपासूनच ठरवून करतात का? की एखाद्या परिस्थितीत अमुकतमुक भूमिका घेतल्यास पक्षाला फायदा होईल हे ठरवतात. हे ही सांगता येणे कठीण आहे. मात्र पुण्यात पुणेरी पगडीचा पागोट्यापर्यंतचा प्रवास हा ‘स्क्रिप्टेड’ नसून तो ‘स्पाँटेनियस’ होता. याबद्दलचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे उघड केलाय.

 पुरोगामित्व, प्रतिगामित्व किंवा सगळे ‘इझम’ शरद पवार यांना बारकाईने माहिती आहेत. मात्र कोणत्यावेळी कोणता विचार, कुठला महापुरूष उचलून धरायचा हा ‘पॉलिटिकल करेक्टनेस’ त्यांच्याकडे पुरेपूर आहे.

मोठ्या नेत्याने एखादी कृती केली की लगेच त्याची बातमी होते. पण त्या कृतीमागे झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याची चर्चा होत नाही. शरद पवारांच्या ‘पुणेरी पगडी ते फुलेंचे पागोटे’ या प्रवासाबद्दल राज्यातले विचारवंत, माध्यमकर्मी चर्चा करत आहेतच. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ‘पगडी ते पागोटे’ यामधला प्रवास. पगडीची पडद्यामागची कथा.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापनदिन आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेचा समारोप पुण्यात सुरू होता. हा चौथा हल्लाबोल समारोप असला तरी यावेळचे खास आकर्षण होते छगन भुजबळ. शरद पवार आणि छगन भुजबळ स्टेजवर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत परंपरेनुसार पुणेरी पगडी घालून केले. पवारांना मात्र काही हे रुचले नाही. त्यांनी पुण्यातील आपले सहकारी अंकुश काकडे यांना जवळ बोलावून ‘फुले घालायचे ते पागोटे मिळते का ते पाहा’ असे सांगितले. खुद्द पक्षाध्यक्ष सांगतायत त्यामुळे काकडेही लागलीच कामाला लागले. त्यांनी संतोष नांगरे या कार्यकर्त्याला मोहिमेवर पाठवले. ‘कसेही करुन फुलेंचे पागोटे घेऊन ये. साहेबांना पाहिजे, ते ही त्यांचे भाषण सुरू होण्याच्या आत.’ संतोषही तत्परतेने कामाला लागला.

संध्याकाळ होत असल्यामुळे इतर पुढारी भाषणं आटोपती घेत होते. पवार कधीही भाषणाला उभे राहतील अशी परिस्थिती होती. कार्यक्रम स्थळापासून जवळपास कुणाकडेच पागोटे मिळण्याची शक्यता नव्हती. पुणे कार्यक्षेत्र असलेल्या संतोषने थेट ‘चोळखण आळी’ गाठली. हे अंतर कार्यक्रम स्थळापासून चार ते पाच किलोमीटर इतके. आळीतल्या ‘मुरुडकर’ यांच्या दुकानातून पगडी विकत घेतली. इकडे पवारांचे भाषण सुरू होण्याची वेळ झाली. काकडे आणि आयोजकांना वाटलं आता काही पगडी येत नाही. पवारसाहेब अगदी काही मिनिटांतच भाषणासाठी उभे राहणार आणि तेवढ्यात संतोष पगडी घेऊन पोहोचला.

पुढे काय झाले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. पवारांनी अचूक टायमिंग साधल्याचे दाखवत भुजबळांना पगडी घालायला सांगितली. टाळ्यांचा गजरात उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. पवारांनीही यापुढे ‘पुणेरी नाही तर फुलेंचे पागोटेच घालायचे’ असा दंडक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घालून दिला. पुढचे काही काळ हे ‘पगडी पुराण’ सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून काढेल याची तजवीजही पवारांनी केली.

आता या पगडीवरुन वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरताहेत, वृत्तवाहिन्यांसकट समाजमाध्यमांवरही खुमासदार चर्चा रंगताहेत. पवार मात्र आपल्या स्वभावानुसार त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. एखादी कृती केली की इतरांना त्याचे वेगवेगळे अर्थ शोधण्याच्या कामाला लावून ते स्वतः पुढच्या मोहिमेवर निघतात. खरेतर हे पगडीचे टायमिंग जुळून आले ते संतोष नांगरे या कार्यकर्त्यामुळे. याची मात्र पवारांनी जाणीव ठेवली. ‘ज्या कार्यकर्त्याने पगडी आणली त्याला माझ्याकडून अभिनंदन सांग,’ असा निरोप पवारांनी काकडे यांना दिला. स्वतः अंकुश काकडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा प्रसंग सांगितलाय. एका तत्पर कार्यकर्त्यामुळे पवारांना पगडीचे आडाखे असे अचूक बांधता आले.
पवारांना ज्योतिबा फुले यांचे पागोटे का आठवले?

तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल यात्रे’ची ही चौथी समारोप सभा होती. मात्र यावेळी आकर्षण होतं छगन भुजबळ यांचंच. कार्यकर्त्यांसहित नेत्यांनाही ते काय बोलतील याची उत्सुकता होती. तब्बल अडीच वर्ष तुरुंगात काढल्यानंतर भुजबळ आपली तोफ डागणार होते. यातच झाले असे, सुरुवातीलाच आयोजकांनी पवार आणि भुजबळ यांना पुणेरी पगडी घातली. स्वतः पवार यांनी याआधी अनेकवेळा पुण्यातील कार्यक्रमात हीच पुणेरी पगडी परिधान केलेली आहे. मात्र यावेळी त्यांच्या ‘डोक्यात’ ती खुपत असावी…

भीमा-कोरेगावचा संघर्ष, देश आणि राज्यातील बिघडलेलं सामाजिक आणि राजकीय वातावरण, औरंगाबादमधील जातीय संघर्ष, आरक्षणावरुन सर्वच समाजाच्या वाढत चाललेल्या अपेक्षा, विद्यमान सरकारच्या विरोधात निर्माण होत असलेली सुप्त नाराजी… त्यातच भुजबळ यांनी भाषणात आरक्षणाच्या मुद्यालाच हात घातला होताच. ‘मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरुन शिवसेनेबरोबर वाद होऊन पक्ष सोडला,’ अशी कबुली भुजबळांनी दिली. पवार हे आरक्षणाबद्दल कसे आग्रही होते, आहेत हे ही भुजबळांनी सांगितले. त्यानंतर अशी सुवर्णसंधी सोडतील ते शरद पवार कसले! फुलेंचे पागोटे भुजबळ यांच्या डोक्यावर ठेवून शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक ‘गेम’ केले…

एक म्हणजे, जोतीराव फुले यांचे वर्तमान अनुयायी छगन भुजबळच असल्याचे अधोरेखित केले. यामुळे पक्ष सोडण्याच्या चर्चेला खुद्द भुजबळांनाच थांबवावे लागेल. तसेच फुलेंचे पागोटे हे ब्राह्मण-ब्राह्मणेतर लढ्याचे एक प्रतीक आहे. तर पुणेरी पगडी पेशवाईचे.

३१ डिसेंबर रोजी पुण्यात काही संघटनांनी ‘नवी पेशवाई’ गाडण्याची हाक देत एल्गार परिषद घेतली होती. या एल्गार परिषदेचे काही आयोजक आज तुरुंगात आहेत. त्यांची अटक अन्यायकारक असल्याचेही पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. भीमा-कोरेगावचा संघर्ष झाल्यानंतर माध्यमांसमोर सर्वात पहिल्यांदा आक्षेप नोंदवणारे शरद पवारच होते.

वर्तमान राजकारण्यांमध्ये पवार यांच्याइतके दांडगे वाचन कुणाचेही नाही. पुरोगामित्व, प्रतिगामित्व किंवा सगळे ‘इझम’ त्यांना बारकाईने माहिती आहेत. मात्र कोणत्यावेळी कोणता विचार, कुठला महापुरूष उचलून धरायचा हा ‘पॉलिटिकल करेक्टनेस’ त्यांच्याकडे पुरेपूर आहे. सध्याचे ब्राह्मणी तोंडवळा असलेले भाजप सरकार उखडून फेकायचे असेल तर मुद्यांसोबतच वैचारिक (किंवा भावनिक म्हणू शकता) खाद्य देणेही गरजेचे आहे, हे पवार चांगले जाणतात. त्यामुळे पक्ष म्हणून भाजपच्या धोरणांवर ते टीका करत राहतीलच. पण फुलेंचे पागोटे घालून महाराष्ट्रातल्या पुरोगामी वर्तुळाला ‘सिम्बॉलिक बुस्टर’ देण्याचेही काम त्यांनी केलेय, असेही म्हणता येईल.

– किशोर गायकवाड

(लेखक ‘आपलं महानगर’चे वरिष्ठ उपसंपादक आहेत)

kishorsamvaad@gmail.com

First Published on: June 18, 2018 2:41 PM
Exit mobile version