वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण शिवसेनेने फेटाळले

वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण शिवसेनेने फेटाळले

एका बाजुला मुंबईतील गड किल्ल्यांच्या जागा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी त्यांचे जतन करण्याच्यादृष्टीकोनातून त्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून केली जात असतानाच दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावला. वांद्रे किल्ल्याचा हा प्रस्ताव केवळ भाजपचे आमदार आणि माजी मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शिफारस केल्यामुळे दप्तरी दाखल केला. परंतु हा प्रस्ताव फेटाळत एकप्रकारे काँग्रेस आणि राष्ट्वादी काँग्रेसच्या पाठबळावर शिवसेनेने आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या संकल्पनेला छेद दिला.

एच/पश्चिम विभागाच्या वांद्रे किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंती पाडून, त्या भिंतींचे पुनर्बांधणी करणे, प्रवेशद्वार बनवणे,शहरी वन निर्माण करणे आदी कामे केली जाणार आहेत. याकामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी एपीआय सिव्हीलकोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करत विविध करांसह २०.६२कोटी रुपयांमध्ये कंत्राट देण्याचा निर्णय घेतला होता.पहिल्या सभेपासून याचे सादरीकरण करण्याची मागणी करत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुढील प्रत्येक बैठकीत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात येत होता. परंतु शुक्रवारी या किल्ल्याच्या सुशोभिकरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

या सादरीकरणानंतर भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांनी हा प्रस्ताव मंजूर करून मुंबईकरांना हा किल्ला वेगळ्या स्वरुपात पाहता येणार आहे. त्यामुळे काही बदल करत याचे सुशोभिकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर स्थानिक काँग्रेस नगरसेवक व समिती सदस्य आसिफ झकेरिया यांनी याला आक्षेप घेतला.किल्ल्याचा परिसर हा पुरातन वास्तूमध्ये येत असल्याने त्या विभागाची परवानगी मिळाली का असा सवाल करत याठिकाणी विद्युत रोषणाईवर साडेपाच कोटी रुपये खर्च होणार आहे. सहा महिन्यांमध्ये हे विद्युत दिवे नादुरुस्त होतात, याकडे लक्ष वेधले. तसेच २००७मध्ये याठिकाणी ५० झोपड्या होत्या, त्या आता ३०० वर पोहोचल्या आहेत. मग या झोपड्या कशा काढणार असा सवाल करत हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची उपसूचना केली.

याला सभागृहनेत्या विशाखा राउुत यांनी पाठिंबा देत याठिकाणच्या झोपड्यांचा मुख्य प्रश्न आहे. मग या झोपड्या काढून त्यांचे पुनर्वसन कुठे करणार असा सवाल त्यांनी केला. यावर भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या सूचनेला विरोध करत मुंबईत अशाप्रकारे अनेक प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. मग ते जपानी गार्डन असो वा लोअर परळमधील जिमखान्यांचे बांधकाम असो. आजही ही कामे झालेली नाहीत. त्यातच हा प्रस्ताव वांद्रे किल्ल्याचा आहे,आणि या परिसरात खुद्द मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री राहत आहेत. त्यामुळे भेदभाव न करता तो मंजूर व्हायला हवा. या किल्याबरोबर माहिम, शीव,शिवडी आदी किल्ल्यांचेही सुशोभिकरण व्हावे,अशीही सूचना केली. यावर मकरंद नार्वेकर यांनी राजकारण न करता पर्यटन क्षेत्र म्हणून याकडे पाहावे,अशी सूचना केली.

तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी रेकॉर्डच्या सूचनेला पाठिंबा देताना स्थानिक नगरसेवकाचे मत विचारात घेतलेच गेले पाहिजे,अशी सूचना केली.

यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोणी शिफारस केली म्हणून वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यापेक्षा प्रशासनाने सर्वच किल्ल्यांचे सुशोभिकरण करावे. त्यासाठी कुणी शिफारस करेल याची वाट पाहून नये. तसेच वांद्रे किल्ल्याचे काम कुणी सुचवले होते त्यांचे नाव जाहीर करावे,असे आवाहन केले. त्यामुळे स्थानिक नगरसेवकाची मागणी विचारत घेता हा प्रस्ताव रेकॉर्ड करतानाच सर्वच किल्ल्यांच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव आणले जावेत,असे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा
मुख्यमंत्री हे वांद्य्रात राहत असल्याचा उल्लेख प्रभाकर शिंदे यांनी केल्यांनतर याचा समाचार घेताना, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री हे वांद्रे नाही तर वर्षावर राहतात. वर्षा हेच त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, वांद्य्रातील निवासस्थान नाही,असे सांगितले. त्यामुळे काँग्रेसला उध्दव ठाकरे यांचे वांद्य्रातील निवास मुख्यमंत्री म्हणून मान्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

वांद्रे किल्ल्याच्या विकासात ही होणार होती कामे

मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडणे
सुरक्षा भिंतीचे पुनर्बांधणी
शोभिवंत जाळी लावणे
सुशोभित प्रवेशद्वार
शौचालय बनवणे
गांडुळ खत तयार करण्यासाठी खड्डा
अंतर्गत बेसाल्ट दगडाचे पदपथ बांधणे
हेरिटेज थीमच्या अनुषंगाने दिशा-चिन्हे आणि नाव पट्टी
पाण्याची ठिकाणे बांधणे
खराब झालेल्या बैठकांची दुरुस्ती
मैदानात विद्युत दिवे
हिरवळीची कामे
शहरी वनीकरण

First Published on: February 15, 2020 7:10 AM
Exit mobile version