शिवस्मारकाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरूवात, समुद्रात जमिनीसाठी लागणार ८ महिने

शिवस्मारकाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरूवात, समुद्रात जमिनीसाठी लागणार ८ महिने

बहुप्रतिक्षित असलेल्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला येत्या ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. शिवस्मारकाच्या कामासाठी समुद्रात दोन टप्प्यात भराव टाकण्यात येणार असून यात पहिल्या टप्प्यात 7.18 हेक्टरवर, तर दुसर्‍या टप्प्यात 5.97 हेक्टरवर भराव टाकला जाणार आहे. स्मारक उभारण्यासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीला ३ वर्षांची कालमर्यादा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवस्मारकाच्या कामाला ऑक्टोबरमध्ये जरी सुरुवात होत असली तरी आधी जेथे स्मारक बनणार आहे त्या ठिकाणी जमीन तयार केली जाईल. त्यासाठी जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

पाऊस कमी होताच खडी, वाळू आणि इतर साहित्य बोटीद्वारे आणण्यात येईल. प्रस्तावित स्मारक गिरगाव चौपाटीच्या समोरील खडकावर उभारले जाणार असून या खडकावर माती टाकण्याच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरवात होईल. शिवस्मारकाच्या कामाचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे. 2500 कोटी पेक्षा अधिक रक्कमेचे हे कंत्राट असून सदर कंपनीला ते दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला सांगितले.

असे असेल शिवस्मारक आणि उंची

शिवस्मारकाची वैशिष्ट्येे

जलदुर्गाशी साधर्म्य असणारी दगडातील समुद्र तटबंदी, आई तुळजाभवानी मंदिर, कला संग्रहालय, ग्रंथ संग्रहालय, मत्स्यालय, अ‍ॅम्पिथिएटर / हेलीपॅड, ऑडीटोरीअम, लाईट व साऊंड शो, विस्तीर्ण बागबगीचे, रुग्णालय, सुरक्षा रक्षक निवासस्थाने,आयमॅक्स सिनेमागृह, प्रकल्पस्थळ ठिकाणी २ जेट्टी, चौथर्‍यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनासाठी सोय, पर्यटकांना स्मारकाकडे जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नवी मुंबई व इतर ठिकाणांहून जाण्याची व्यवस्था, स्मारक ठिकाणी शिवकालिन वातावरण निर्मिती.

वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाई

स्मारकाच्या उभारणीसाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीला ३ वर्षांची मुदत दिली आहे. या मुदतीत काम न केल्यास कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी लागणारे साहित्य कशा पद्धतीने समुद्रात आणण्यात येणार याचा अभ्यास पूर्ण झाला असून खडी, वाळू तसेच इतर साहित्य लवकरच आणले जाईल. याबद्दल इंजिनिअरशी चर्चा सुरू आहे.

शिवरायांच्या स्मारकाची दक्षिण मुंबईत प्रतिकृती उभारणार

अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची दक्षिण मुंबईत प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत फाऊंटन, काळाघोडा, गेटवे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट यापैकी एका ठिकाणी प्रतिकृती उभारण्यात येणार असून त्याची उंची २५ फूट असणार आहे. प्रतिकृतीच्या सहाय्याने तज्ञ, सामान्य मुंबईकर आणि विशेष म्हणजे पर्यटकांकडून त्यांची मते आणि सल्ले जाणून घेण्यात येतील. स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर तर नरिमन पॉईंट पासून २.६ किलोमीटर अंतरावर जागा निश्चित करण्यात आली आहे.

स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार आहेत. युती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे स्मारक उभारले जात आहे. जे इतकी वर्षे काँग्रेस आघाडी सरकारला जमले नाही ते भाजप सरकारने करून दाखवले आहे.  – विनायक मेटे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष

First Published on: September 22, 2018 6:30 AM
Exit mobile version