शिवभोजन थाळीला राज्यात जबरदस्त प्रतिसाद

शिवभोजन थाळीला राज्यात जबरदस्त प्रतिसाद

राज्यातील गरीब व गरजू लोकांना स्वस्त आणि मस्त जेवण देण्यासाठी सुरु झालेल्या शिवभोजन योजनेला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य लोक या योजनेवर खूष आहेत. प्रजासत्ताक दिनानापासून सुरु झालेल्या या योजनेत आतापर्यंत राज्यातील २ लाख ३३ हजार ७३८ लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या दहा रुपयांमध्ये “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात प्रजासत्ताक दिनापासून ही योजना सुरु झाली. आता या योजनेला १७ दिवस पुर्ण झाले असून, या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी ही योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे २ फेब्रुवारी पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक  झाली होती. आणि आता पर्यंत या शिवभोजन थाळ्यांचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

योजनेवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष

शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांनी थेट संवाद साधला होता. यावेळी त्यांनी जेवणाबाबत समाधानी आहात का? जेवणाची चव व्यवस्थित आहे का? काही सूचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले होते. त्यावर जेवण खुप छान आहे; गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात, अशी प्रतिक्रिया योजनेतील थाळीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती.

जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये, इ. ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत, त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना, मजूरांना याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. दरदिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची ११ हजार ३०० थाळींची संख्या आता १४ हजार ६३९ वर पोहोचली आहे. या योजनेतुन राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरु झाली आहेत.


हेही वाचा – मनसेचा नवा झेंडा वादात, निवडणूक आयोगाची नोटीस


 

First Published on: February 12, 2020 8:58 PM
Exit mobile version