बेस्ट समितीत दोन्ही उमेदवारांची मते बाद; तरी शिवसेनेचे प्रवीण शिंदे विजयी

बेस्ट समितीत दोन्ही उमेदवारांची मते बाद; तरी शिवसेनेचे प्रवीण शिंदे विजयी

बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी धक्कादायक प्रकार घडला. शिवसेनेचे उमदेवार प्रवीण शिंदे आणि भाजपचे उमदेवार प्रकाश गंगाधरे या दोघांची मते अवैध ठरली. दोन्ही उमेदवारांची मते स्वतःला मिळू शकली नाही. आवाजी मतदान उमेदवार म्हणून स्वतःला घोषित केल्यानंतर प्रत्यक्ष स्वाक्षरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावापुढे केल्याने ही मते अवैध ठरली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे प्रवीण शिंदे विजयी झाले असले तरी आजवरच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची मते अवैध ठरण्याची ही पहिली घटना आहे.

बेस्ट समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने प्रवीण शिंदे, काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपच्यावतीने प्रकाश गंगाधरे निवडणूक रिंगणात होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांच्या वेळेत रवी राजा यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रवीण शिंदे आणि प्रकाश गंगाधरे यांच्यात झालेल्या लढतीत शिंदे यांना ८ तर गंगाधरे याना ५ मते मिळाली. तर काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मत सेनेच्या पारड्यात गेले.

मात्र विजयी उमेदवार शिंदे यांना स्वतःचे मत स्वतःला घेता आले नाही. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावापुढे स्वाक्षरी केल्याने त्यांचे मत बाद ठरले. तर असाच प्रकार भाजपचे गंगाधरे यांच्याकडूनही झाला. त्यामुळे त्यांचेही मत बाद ठरले. यामुळे प्रवीण शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र या प्रकारानंतर भाजप उमेदवार प्रकाश गंगाधरे यांनी आपल्या कडून ही चूक झाल्याचे मान्य करत आपण बेस्ट समिती सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

First Published on: October 6, 2020 2:10 PM
Exit mobile version