‘मला नगरसेवकांची भिती वाटते’, शिवसेना नगरसेवकाचं आयुक्तांना पत्र!

‘मला नगरसेवकांची भिती वाटते’, शिवसेना नगरसेवकाचं आयुक्तांना पत्र!

‘कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी रूग्णालयात आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या दहशतीमुळे महासभा किंवा स्थायी समितीला उपस्थित राहू शकत नाही. त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा’, असे खळबळजनक पत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके आणि पालिका सचिव संजय जाधव यांना दिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

‘पालिकेत सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवावी’

गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवाराचा पराभव होऊन भाजपचे विकास म्हात्रे हे विजयी झाले होते. स्थायी समितीत शिवसेनेचे वर्चस्व असतानाही सेनेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस आणि मनसेने भाजपला मतदान केल्याने आणि शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे गैरहजर राहिल्याने भाजपचा विजय सुकर झाला होता. मात्र, आजारपणामुळे रूग्णालयात अॅडमिट असल्याने सभेला उपस्थित राहू शकलो नसल्याचे पत्र नगरसेवक म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. स्थायी समितीत नाईलाजाने गैरेहजर राहावे लागल्याने गैरसमजातून काही लोकप्रतिनिधी दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सभागृहात किंवा स्थायी समितीत जीविताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अन्यथा मी आजारी असल्याने आणि या लोकांच्या दहशतीमुळे महासभेत आणि स्थायी समितीत उपस्थित राहू शकणार नाही. या लोकांपासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना समज देण्यात यावी, अशीही विनंती म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. मात्र, या पत्रामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं आहे.

First Published on: January 16, 2020 9:26 PM
Exit mobile version