हा तर पोलिसांनी घेतलेला सूड; ‘त्या’ घटनेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

हा तर पोलिसांनी घेतलेला सूड; ‘त्या’ घटनेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

कुख्यात गुंड विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रतिक्रियेत हा तर पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे की, पोलिसांचे खच्चीकरण करणारी वक्तव्ये केली जाऊ नयेत. मोठी नावे बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असे वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे. हा उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – Video : …म्हणून शरद पवार संसदेत मोदी यांच्या चेंबरमध्ये गेले होते

संजय राऊत यांनी चकमकीचे समर्थन केले नसले तरी पोलिसांना मारणाऱ्याला देशाच्या कोणत्याही राज्यातील पोलीस अशा गुन्हेगारांना जिवंत सोडणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झाले त्याचे राजकारण होता कामा नये, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केले आहे. तसेच अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचे कधी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.

एक शरद… मुलाखतीवरून विरोधकांना टोला 

दरम्यान, पत्रकारांनी संजय राऊत यांच्या शरद पवार यांच्या मुलाखतीसंबंधीही प्रश्न विचारला. सध्या राजकीय वर्तुळात या खास मुलाखतीची चर्चा आहे. याचे शिर्षकही राऊत यांनी एक शरद बाकी गारद असे दिले आहे. यावर संजय राऊतांवर एक नारद…, अशी खोचक टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी हे शिर्षक देऊन शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा दोन शरद…, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी शरद पवार आणि शरद जोशी या दोन दिग्गजांचा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र आता एक दिग्गज शरद पवार असल्यामुळे एक शरद… बाकी गारद असे शिर्षक दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी थोडी माहिती घेऊन बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.

First Published on: July 10, 2020 1:02 PM
Exit mobile version