भाजपाची शिष्टाई फेल, आदित्य ठाकरेंचा स्वबळाचा नारा!

भाजपाची शिष्टाई फेल, आदित्य ठाकरेंचा स्वबळाचा नारा!

फोटो सौजन्य - Wikipedia

शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीसाठी कंबर कसली आहे यावर आत्ता शिक्कामोर्तब झाले आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील ‘एकहाती सत्ता हेच ध्येय’ असे वक्तव्य करत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

‘एकहाती सत्तेसाठी आजपासून कामाला लागा, मेहनत करा’ असे आदेश देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. तसेच ‘आपल्याला राज्य नाही तर देशपातळीवर शिवसेनेचा पसारा वाढवायचा आहे’ असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या ५२व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगावमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संध्याकाळी उद्धव ठाकरे देखील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख नेमका काय आदेश देणार याकडे आता शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहेत.

भाजपवर टीकेचे बाण

पालघरमध्ये शिवसेनेने आपली ताकद दाखवली. शिवसेनेला पालघरमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी तो पराभव नसून आपला विजय असल्याचे आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘देशात पैसेवाला केवळ एकच पक्ष’ अशी शाब्दिक कडी करत आदित्य यांनी भाजपला टार्गेट केले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या साम, दाम, दंड, भेद या विधानाचा देखील त्यांनी समाचार घेतला. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरूद्ध भाजप हे राजकीय भांडण दिवसेंदिवस अधिक वाजणार हे नक्की!

शिवसेना स्वबळावर ठाम

मुंबई पालिका निवडणुकीच्या वेळी मी कुणाकडेही युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी युतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेना – भाजप या मित्रपक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही.

दिवसेंदिवस वाढती कटुता आणि टीका यामुळे दोन्ही मित्रपक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वारी केली. दोन तास बंद दाराआड चर्चा केल्यानंतर देखील उद्धव ठाकरे स्वबळासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी ‘माय महानगर’ला दिली आहे.

‘सामना’तून भूमिका स्पष्ट

‘सामना’तून देखील ‘२०१४चा राजकीय अपघात २०१९मध्ये नाही’ अशा शब्दात स्वबळाचा नारा देण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांना ‘एकहाती सत्ता हेच ध्येय’ असा आदेश दिल्याने ‘युती नाहीच’ यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण, अद्याप पक्षप्रमुखांनी भूमिका स्पष्ट न केल्याने संध्याकाळच्या भाषणात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांसह राजकीय जाणकाराचे देखील लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: June 19, 2018 12:09 PM
Exit mobile version