प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची फसवणूक

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची फसवणूक

जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विरारमधील एका बिल्डरकडून ३८ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनुराधा पौडवाल यांनी मंगळवारी विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याचा जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. या बांधकाम कंपनीचे संचालक आरोपी अविनाश ढोले, राजू सुरिले आणि अन्य बिल्डरांनी ग्लोबल सिटी भागात बांधकाम प्रकल्पाची जाहिरात केली होती.

नेमके काय घडले?

विरार पश्चिम या ठिकाणी ग्लोबल सिटी भागात मंदार रिअॅल्टर्स या कंपनीचा बांधकाम प्रकल्प सुरु होता. या कंपनीने गृहप्रकल्प करताना अनेक जाहिराती देखील केल्या होत्या. या जाहिरातीमध्ये समोरच्याला आकर्षित करणारे फ्लॅट आणि अनेक सोयी-सुविधांसह तुम्हाला घरे मिळणार, अशी जाहिरात बांधकाम कंपनीने केली होती. ही जाहिरात पाहून अनेकांनी आपला पैसा यामध्ये गुंतवला होता. त्याचप्रमाणे जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील या गृहप्रकल्पामध्ये दोन सदनिकांसाठी २०१२ मध्ये ३८ लाख ९४ हजार रुपये दिले होते. त्यांचे अॅग्रीमेंटही झाले मात्र फ्लॅट त्यांना मिळालाच नाही. त्यामुळे त्यांनी अखेर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याचा जबाब नोंदवला आहे.

सहा ग्राहकांची फसवणूक

विरारमधील ग्लोबल सिटी भागात मंदार रिअॅल्टर्स या कंपनीच्या बांधकाम प्रकल्पात एकूण सहा ग्राहकांची फसवणूक केली आहे. ७० लाखांची ही फसवणूक करण्यात आली आहे. या बांधकाम प्रकल्पात कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी याबाबत तक्रार दाखल करावी असे आवाहन अर्नाळा सागरी पोलिसांनी केले आहे.

First Published on: September 26, 2018 9:55 AM
Exit mobile version