या कारणामुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया झाल्या रद्द

या कारणामुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया झाल्या रद्द

सायन रुग्णालय

रुग्णांची कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेस साहित्य लागते. मात्र हे साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांचे ९० कोटी रुपये सरकारने थकवल्याने कंत्राटदारांनी सरकारी रुग्णालयांना साहित्य न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शस्त्रक्रिया रखडण्याची शक्यता दिसून येत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना घालायला दिले जाणारे कपडे नसल्याने सोमवारी एकूण ४० रुग्णांच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कपडे नसल्याने शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

या लॉण्ड्रीत दिले जातात कपडे

सायन रुग्णालयातील रुग्णांचे कपडे लॉण्ड्रीत धुवायला दिले जातात. त्यातील ५० टक्के कपडे प्रभादेवी येथील पालिकेच्या सेंट्रल लॉण्ड्रीमध्ये तर ५० टक्के कपडे हे खासगी लॉण्ड्रीमध्ये धुण्यासाठी पाठवले जातात. मात्र खाजगी लॉण्ड्रीचे कंत्राट हे जून २०१७ मध्येच संपल्यामुळे आता या खाजगी लॉण्ड्रीमध्ये कपडे धुण्यास दिले जात नाहीत. त्यामुळे खाजगी लॉण्ड्रीमध्ये धुतले जाणारे ५० टक्के कपडे देखील आता पालिकेच्या सेंट्रल लॉण्ड्रीमध्ये धुण्यासाठी पाठवले जातात. सेंट्रल लॉण्ड्रीमध्ये एकूण ३८ कर्मचारी असून त्यांच्यावर आता खाजगी लॉण्ड्रीचा देखील अतिरिक्त बोजा पडत असल्याने मोठ्या प्रमाणात कपडे धुणे शक्य होत नाही. दररोज सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कपडे धुण्यासाठी पाठवले जातात त्यामुळे एवढे कपडे धुऊन देणे कठीण होत असल्याने कपडे वेळेत मिळत नाही. यामुळे ४० रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणे रद्द करण्यात आले.

या विभागातील शस्त्रक्रिया रद्द

वेगवेगळ्या आजारांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्या दरम्यान अनेकदा रक्ताचे डाग पडतात. यामुळे संसर्ग देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांना स्वच्छ कपडे देणे आवश्यक असतात. यामुळे हे कपडे धुतले जातात. धुतलेले कपडे न मिळाल्यामुळे युरोलॉजी, ऑर्थोपेडिक, न्युरॉलॉजी आणि जनरल शस्त्रक्रिया या विभागातील ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत.

नवीन तारखा कधी मिळणार?

सायन रुग्णालयातील युरोलॉजी, ऑर्थोपेडिक, न्युरॉलॉजी आणि जनरल या विभागातील ४० रुग्णांची सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होत्या. मात्र या शस्त्रक्रिया रद्द केल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी तारखा मिळाल्या होत्या. मात्र आता या तारखा रद्द करण्यात आल्या असून आता पुन्हा कधी नवीन तारखा मिळणार असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे.

पालिकेच्या लॉण्ड्रीत ४५ पदे रिक्त

महापालिकेच्या सेंट्रल लॉण्ड्रीत एकूण ८३ पदे असून सध्या ३८ कर्मचारी काम करत आहेत. या लॉण्ड्रीत ४५ पदे रिक्त असून देखील ही पदे भरण्यात आलेली नाही. रिक्त पदे भरल्यास १५ हजार कपडे धुतले जाऊ शकतात. तर या लॉण्ड्रीत एकूण १० मशिन असून त्यातील दोन मशिन बंद अल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: September 25, 2018 10:20 AM
Exit mobile version