मुंबईतील गगनचुंबी इमारती आगीपासून असुरक्षित

मुंबईतील गगनचुंबी इमारती आगीपासून असुरक्षित

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत एखाद्या टोलेजंग इमारतीत आपले हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु याच टोलेजंग इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. गेल्या काही काळात मुंबईच्या गगनचुंबी इमारतींमध्ये सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना समोर आल्याने या इमारती आगीपासून सुरक्षित नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. गेल्या 10 वर्षांत तब्बल 1 हजार 568 टोलेजंग इमारतींना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

वर्ष 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48 हजार 434 ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यापैकी गगनचुंबी इमारतींना लागलेल्या आगींची आकडेवारी 1 हजार 568 इतकी आहे. आग लागण्याच्या काही महत्वाच्या कारणांमध्ये शॉर्ट सर्किट, गॅस सिलेंडर लिकेज ही दोन प्रमुख कारणे समोर आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 32 हजार 516 वेळा शॉर्ट सर्किटमुळे आणि 1 हजार 116 वेळा गॅस सिलेंडर लिकेजमुळे आगी लागल्या आहेत. तर 11 हजार 889 वेळा अन्य कारणांमुळे आगी लागल्या आहेत. दरम्यान गेल्या 10 वर्षांत या आगींमध्ये 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आगीच्या घटनांमध्ये एकूण 89 कोटी 04 लाख 86 हजार 102 रुपयांचे नुकसान झाले आहे.

इमारतींमध्ये लागलेल्या आगीची आकडेवारी

रहिवासी इमारती – 8 हजार 737
व्यावसायिक इमारती – 3 हजार 833
झोपडपट्ट्यांमधील आग – 3 हजार 151

कोट्यवधींचे नुकसान

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-३ च्या हद्दीत एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त रहिवासी इमारतीत परिमंडळ-४ च्या हद्दीत 1 हजार 835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-१ च्या हद्दीत 987 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-५ च्या हद्दीत 1 हजार 237 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तर सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी परिमंडळ-१ च्या हद्दीत झाला आहे. सर्वात जास्त आगीच्या घटनांत एकूण 39 कोटी 48 लाख 9 हजार 686 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

First Published on: September 6, 2018 5:36 AM
Exit mobile version